बेळगाव जिल्हा प्रशासन, महिला आणि बाल कल्याण खाते, बेळगाव जिल्हा पंचायत आणि जिल्हा बाल संरक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अंगविकलांग (दिव्यांग) मुलांना लॅपटॉपसह अन्य आवश्यक साधने वितरित करण्याचा कार्यक्रम आज सायंकाळी उत्साहात पार पडला.
बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहामध्ये आयोजित सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले, खासदार मंगला अंगडी, खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार ॲड. अनिल बेनके, कित्तूरचे आमदार दोड्डगौडर आदींसह जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ आणि जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर मंत्री शशिकला जोल्ले, खासदार मंगला अंगडी तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते लाभार्थी माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेतील 5 मुला-मुलींना टाॅकिंग लॅपटॉप तसेच इतर लाभार्थी अंगविकलांग मुलांना व्हिलचेअर आदी अन्य साधनांचे वितरण करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन यांनी अंगविकलांग मुले आणि व्यक्तींसाठी सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची तसेच मुलांसाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. सदर कार्यक्रमात माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेतील उषा कांबळे, चैत्रा गंगेर, दर्शना मिरासे, राहुल कम्मार व संजू रेड्डी या पाच गुणी विद्यार्थी-विद्यार्थिनींना टॉकिंग लॅपटॉप वितरित करण्यात आले. त्याप्रमाणे आराधना गतिमंद मुलांच्या शाळेतील मुलांसाठी 3 व्हील चेअरचे वितरण करण्यात आले. याखेरीज अन्य साधनांचे वाटप करण्यात आले. अन्य लाभार्थी मुलांमध्ये सिद्धू लक्ष्मण भागन्नावर मुतगा, मलसर्ज देसाई खासबाग, श्रीधर कोलकार गणीकोप्प, भीमसेन लंबूगोळ बाळेकुंद्री खुर्द, अनिल कालकुंद्रीकर बेळगाव, संजय जाधव, अजित जांगळे मुतगा, बाबू देवेंद्र जांगडे मुतगा आदींचा समावेश आहे.
याप्रसंगी महिला आणि बाल कल्याण खात्याचे उपसंचालक बसवराज वरवटी, नामदेव बैलकर, माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेचे अध्यक्ष विकास कलघटगी, मुख्याध्यापिका अनिता गावडे आदींसह जि. पं. सदस्य, विशेष मुलांच्या शाळांचे मुख्याध्यापक, पालक आणि हितचिंतक उपस्थित होते.