कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटाला सामोरे जात असलेल्या कामगारांच्या वेगवेगळ्या 11 संघटित गटांना सरकारने मदत जाहीर केली आहे. ती मदत एजंटांच्या हस्तक्षेपाविना थेट संबंधित कामगारांपर्यंत पोचविण्यासाठी तात्काळ योग्य ती पावले उचला, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये आज बुधवारी सकाळी आयोजित कामगार संघटनेचे नेते, कामगार खात्याचे अधिकारी तसेच संबंधित अन्य अधिकाऱ्यांच्या महत्वाची बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी उपरोक्त सूचना केली. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटाला सामोरे जात असलेल्या धोबी, टेलर, हमाल, न्हावी, कुंभार, घरगुती कामगार, मेक्यॅनिक, लोहार आदी विविध 11 असंघटीत कामगारांच्या गटांना सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे.
या कामगारांना प्रत्येकी 2 हजार रुपये सरकारकडून मिळणार आहेत. ही मदत संबंधित कामगारांपर्यंत पोचविण्यासाठी कामगार खात्याकडून योग्य ती पावले उचलली जावीत. सदर कामगारांना आर्थिक मदत देण्याच्या प्रक्रियेत एजंटांचा हस्तक्षेप नको किंवा ही मदत पोहोचविण्यासाठी मध्यस्त घेऊ नये तसे झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिला.
बांधकाम क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात आली आहेत. या कामगारांना प्रत्येकी 3 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. ही मदत संबंधितांपर्यंत एजंटांच्या हस्तक्षेपाविना पोचली पाहिजे असे सांगून असंघटित कामगारांनापर्यंत सरकारची आर्थिक मदत कशी पोहोचवता येईल याबाबत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
दरम्यान, बेळगाव लाईव्हशी बोलताना कामगार नेते ॲड. एन आर लातूर म्हणाले की, बांधकाम क्षेत्रातील कामगारांसह असंघटित कामगारांसाठी आर्थिक मदत बेंगलोर येथून करण्यात येणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रात सुमारे दीड लाख कामगार कार्यरत आहेत. या सर्वांसाठी 45 कोटी रुपयांची आर्थिक मदत बेळगाव जिल्ह्याकडे पाठविण्यात आली आहे. त्यामुळे ज्या बांधकाम कामगारांची अधिकृत नोंदणी झाली आहे त्यांना सरकारची प्रत्येकी 3 हजार रुपये प्रमाणे आर्थिक मदत मिळणार आहे. असंघटित कामगारांमध्ये मोडणाऱ्या धोबी, टेलर, हमाल, कुंभार आदी 11 प्रकारच्या कामगारांची आंबेडकर सहाय्य हस्त योजने अंतर्गत नांव नोंदणी झाली आहे.
ही नोंदणी झालेल्या कामगारांना प्रत्येकी 2 हजार रुपये आर्थिक मदत मिळणार आहे असे सांगून तथापि ज्या असंघटित कामगारांनी आपली नांव नोंदणी केलेली नाही त्यांनी त्वरेने सिंधू सेवा ॲपवर ऑनलाइन नांव नोंदणी करून आर्थिक मदतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲड. लातूर यांनी केले आहे.