अश्लील सीडीप्रकरणी राजीनामा देणारे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांना पुन्हा मंत्रिपद देऊन मंत्रिमंडळात समाविष्ट करून घ्यावे, या मागणीसाठी दलित क्रांती सेना आणि घटप्रभा रमेश जारकीहोळी अभिमानी बळगं या संघटनांतर्फे आज उंट स्वारीद्वारे अभिनव आंदोलन छेडून मुख्यमंत्र्यांच्या नांवे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
अश्लील सीडीप्रकरणी आपल्या पदाचा राजीनामा देणारे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांना पुन्हा मंत्री पद द्यावे या मागणीसाठी दलित क्रांती सेना आणि घटप्रभा रमेश जारकीहोळी अभिमानी बळगं या संघटनांनी अशोककुमार असोदे यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी सकाळी येथील कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथे उंट स्वारीव्दारे अभिनव आंदोलन छेडले.
यावेळी सफेद गांधीटोपी आणि सफेद पोषाख घालून उंटावर स्वार झालेले कार्यकर्ते सार्यांचे लक्ष वेधून घेत होते. चन्नम्मा सर्कल येथे रमेश जारकीहोळी यांच्या जयजयकाराच्या आणि त्यांना मंत्रिपद मिळावे, या मागणीच्या घोषणा देऊन निदर्शने केल्यानंतर दलित क्रांती सेना आणि घटप्रभा रमेश जारकीहोळी अभिमानी बळगच्या कार्यकर्त्यांनी असोदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन सादर केले. सदर मोर्चात आठ उंटांचा समावेश होता.
माजी मंत्री रमेश जारकीहोळी हे अत्यंत लोकप्रिय नेते असून त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे. तेंव्हा मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी याप्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर जारकीहोळी यांना न्याय मिळवून द्यावा.
त्यासाठी त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान द्यावे आणि पूर्वीचे जलसंपदा मंत्रीपद द्यावे, अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडेही आम्ही ही मागणी करत आहोत, अशी माहिती दलित क्रांती सेनेचे राज्य अध्यक्ष अशोककुमार असोदे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.