प्रताप गल्ली, येळ्ळूर येथील समीक्षा पाटील या मुलीने प्रथमोपचार करून जीवदान दिलेल्या एका बगळ्याला सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी आज नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वन खात्याकडे सुपूर्द केले.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, प्रताप गल्ली येळ्ळूर येथील पाटील कुटुंबीयांच्या चरावयास गेलेल्या म्हशी काल सायंकाळी जेंव्हा घरी परतल्या त्यावेळी त्यांच्या समवेत एक बगळा देखील होता. त्या बगळ्याला नीट उडता येत नव्हते. तेंव्हा पाटील यांची कन्या समीक्षा हिने त्या बगळ्याला काळजीपूर्वक पकडून तपासणी केली असता त्याच्या पंखाला दुखापत झाल्याचे तिच्या निदर्शनास आले.
त्यावेळी समीक्षाने आपल्या आई वडिलांच्या मदतीने त्या जखमी बगळ्यावर प्रथमोपचार करून त्याला एका पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये सुरक्षित ठेवले. तसेच याबाबतची माहिती पशुपक्षी प्रेमी सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांना दिली.
संतोष दरेकर यांनी आपले मित्र जॉर्ज रॉड्रिग्स यांच्यासमवेत तात्काळ आज सकाळी येळ्ळूर गाठून जखमी बगळ्याला आपल्या ताब्यात घेते. तसेच बेळगाव येथील वनखात्याच्या कार्यालयात जाऊन त्या बगळ्याला व्यवस्थित उपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वनरक्षक श्रीकांत देसाई यांच्याकडे सुपूर्द केले.
समीक्षा पाटील हिच्या प्रमाणे जर कोणाला आपल्या घरानजीक अथवा अन्यत्र कुठेही एखादा जखमी अवस्थेतील असहाय्य पशुपक्षी आढळून आल्यास त्याने आपल्याशी (मो.क्र. 9986809825) संपर्क साधावा, असे आवाहनही संतोष दरेकर यांनी यावेळी केले.