कोरोना विषाणू प्रमाणे चीनमधून भारतामध्ये अतिशय धोकादायक अशा उभे पीक नष्ट करणाऱ्या भात बियाणाची आयात होत असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ही बियाणे कोणत्याही परिस्थितीत खरेदी करू नयेत, असे आवाहन बेळगाव जिल्ह्याचे मुख्य कृषी संचालक शिवानंद एस. पाटील यांनी केले आहे.
भारतासह जगभरातील जीवघेण्या कोरोनाविषाणू प्रादुर्भावास कारणीभूत असणाऱ्या चीन देशाने आता कृषी क्षेत्रालाही सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. चीनकडून सध्या विशिष्ट प्रकारच्या घातक किटाणूजन्य भात बियाणाची निर्यात केली जात आहे.
हे भात बियाण शेतात लावल्यास भाताचे उभे पीक नष्ट होत आहे. कॅनडा व इंग्लंडमध्ये देखील ही बियाणे पाठविण्यात आली असून त्याठिकाणी भाताची पिकेच्या पिके नष्ट होण्याच्या घटना घडल्या आहेत.
तेंव्हा बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सावध रहावे. चीनमध्ये उत्पादित झालेल्या या भात बियाणाची कोणत्याही परिस्थितीत खरेदी करू नये. एखाद्याच्या नांवाने सदर बियाणाचे पार्सल आल्यास त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती नजीकच्या कृषी केंद्राला द्यावी.