लाॅक डाऊनमुळे निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन अन्न व नागरी पुरवठा खात्याने रेशन दुकानातून वाढीव धान्य पुरवठा सुरू केला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत मे महिन्यापासून बीपीएल व अंत्योदय रेशन कार्डधारकांना वाढीव तांदूळ देण्यात येत आहे. नोव्हेंबरपर्यंत या योजनेद्वारे बीपीएल व अंत्योदय रेशन कार्डधारकांना याचा लाभ मिळणार आहे.
लाॅक डाऊनमुळे गरीब व गरजू लोकांना दोन वेळचे जेवण मिळणे कठीण बनले आहे. यासाठी बीपीएल व अंत्योदय रेशन कार्डधारकांच्या कुटुंबियांना सोयीचे ठरावे यासाठी नोव्हेंबरपर्यंत 5 महिने वाढीव धान्य पुरवठ्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या बीपीएल रेशन कार्डधारकांना प्रत्येक सदस्यामागे राज्य सरकारतर्फे 5 किलो व केंद्र सरकारतर्फे 5 किलो असे एकूण 10 किलो तांदूळ देण्यात येत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन काळात उद्योग, व्यवसाय आणि काम धंदे गमावल्यांना दोन वेळचे जेवण मिळण्याची सोय झाली आहे.
याआधी केवळ मे व जून या दोन महिन्यासाठी या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत होती. त्यामुळे यंदा बीपीएल व अंत्योदय रेशन कार्डधारकांना पुढे काय होणार याची चिंता लागली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत गेल्या सोमवारी घोषणा केल्यामुळे संभ्रम दूर झाला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत पुढील नोव्हेंबरपर्यंत या योजनेची अंमलबजावणी सुरु राहणार आहे. यामुळे जिल्ह्यातील लाखो बीपीएल व अंत्योदय रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.