प्रत्येक गावात तळे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. प्रत्येक गावात एक तळे निर्माण झाल्यास त्याचा उपयोग शेतकऱ्यांना होईल, शिवाय तळ्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल, असे विचार ग्राम विकास आणि पंचायत राज्य मंत्री के.एस. ईश्वराप्पा यांनी व्यक्त केले.
बेळगावातील जिल्हा पंचायत सभागृहात अधिकारी आणि सर्व ग्राम पंचायत अध्यक्ष यांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक गावात एक तळे असले पाहिजे. पूर्वी गावोगावी तळी होती. त्यामुळे पाण्याच्या बाबतीत प्रत्येक गाव आत्मनिर्भर होते. पण कालांतराने विविध कारणाने तळी नष्ट झाली आणि गावोगावी पाण्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या. तळी निर्माण करण्यासाठी ग्राम पंचायतीला जागाही देण्यात येत असल्याचे सांगून अस्तित्वात असलेल्या तळ्यांचा ताबा ग्राम पंचायतीकडे द्यावा अशी सूचनाही ईश्वराप्पा यांनी केली.
कचरा निर्मूलन प्रकल्प उभारण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील ग्राम पंचायतींना जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांचे अभिनंदन केले. कोरोनाला रोखण्यासाठी ग्राम पंचायतींनी हाती घेतलेल्या उपाययोजनांची माहिती मंत्र्यांनी बैठकीत घेतली. नरेगा योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आलेल्या गावांची माहिती देखील मंत्र्यांनी अधिकारीवर्गाकडून घेतली.
यावेळी मंत्री ईश्वराप्पा यांनी बैठकीला उपस्थित ग्राम पंचायत अध्यक्षांबरोबर संवाद साधला. बैठकीत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबतही चर्चा करण्यात आली. बैठकीस जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्यासह संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.