कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बेळगावमध्ये परिस्थिती चिंताजनक बनली असून वैद्यकीय सुविधांचा अभाव निर्माण होऊन रूग्णांचे हाल होत असल्यामुळे बेळगावमध्ये एम्स अर्थात ऑल इंडिया मेडिकल सायन्सेसची शाखा त्वरित सुरू करावी, अशी मागणी बेळगावच्या विनय नाथाजी चव्हाण यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे पत्राद्वारे केली आहे.
बेळगावमध्ये कोरोनाचा कहर झाला असून वाढत्या रुग्ण संख्येमुळे निर्माण झालेली चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन बेळगावात एम्सची शाखा सुरू करावी अशी मागणी गोंधळी गल्ली येथील रहिवासी विनय नाथाजी चव्हाण यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे केली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उत्तर कर्नाटकातील बेळगाव, बिदर, रायचूर आणि कलबुर्गी या शहरांमध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वैद्यकीय सुविधांचा आणि संरचनांचा अभाव हे या परिस्थितीला कारणीभूत आहेत.
सध्याच्या परिस्थितीत बेळगावला एम्सची शाखा सुरू केल्यास त्याचा रुग्णांना लाभ होऊ शकेल, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे. या पत्राची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेऊन ते पत्र आरोग्य मंत्रालयाकडे वर्ग केले आहे. तथापी आरोग्य मंत्र्यांनी सध्या अंदाजपत्रकामध्ये तशी कोणतीही तरतूद नसल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, चव्हाण यांनी कर्नाटक सरकारचे दिल्ली प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनाही बेळगावातील त्यांच्या निवासस्थानी जाऊन आपल्या मागणी पत्राची प्रत सादर केली आहे. एम्सच्या शाखेमुळे रुग्णांना चांगले उपचार मिळण्याबरोबरच अव्वाच्या सव्वा खर्च टळणार नाही.
राष्ट्रीय आपत्ती लक्षात घेऊन कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेप्रमाणे फास्टट्रॅक अप्रूव्हल अंतर्गत बेळगावात एम्सची शाखा सुरू करण्याबाबतही विचार केला जावा, असे विनय चव्हाण यांनी सुचविले आहे.