Wednesday, December 25, 2024

/

*पर्यटकांना खुणावू लागलायं दूध सागर धबधबा*

 belgaum

गेल्या कांही दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे ठिकठिकाणचे धबधबे ओसंडून वाहू लागले असून कर्नाटक आणि गोवा सीमेवरील पश्चिम घाटाच्या हिरव्यागार कुशीत वसलेला दूध सागरचा धबधबा देखील गेल्या आठवडापासून पर्यटकांना खुणावू लागला आहे.

चालत्या रेल्वेगाडीतून दूध सागरचा विलोभनीय धबधबा पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्यामुळेच या ठिकाणचा रेल्वेमार्ग पर्यटन केंद्र बनला आहे. पश्चिम घाटाच्या अत्यंत दुर्गम आणि अवघड भागातून कोसळणाऱ्या या धबधब्यापर्यंत जाणे कठीण असले तरी पश्चिम रेल्वेने पर्यटकांसाठी धबधब्याचा परिसर आकर्षक करण्यासाठी विविध उपाय सुरू केले आहेत. दूध सागर रेल्वे स्थानकापासून 600 मीटर अंतरावर असणाऱ्या या धबधब्याचा आनंद पर्यटकांना मनमुराद लुटता यावा यासाठी त्या ठिकाणचा विकास साधण्याची माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांची खूप इच्छा होती. यांच्या मार्गदर्शनाखाली 2019 मध्ये कांही उपाय योजना देखील हाती घेण्यात आल्या होत्या. त्यानुसार पर्यटकांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकापासून दूध सागर धबधब्यापर्यंत पदपथ तयार करण्यात आला. तसेच प्रवाशांसाठी टॉयलेट्स, टी-स्टॉल सारख्या मूलभूत गरजा उपलब्ध करून देण्यात आल्या. ज्यामुळे पर्यटकांची सोय होण्याबरोबरच धबधब्यांचे ठिकाण पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले.

जेंव्हा कोविड कर्फ्यू आणि इतर निर्बंध पूर्णपणे उठविले जातील त्यावेळी दूध सागरचा धबधब्याचे पर्यटन स्थळात रुपांतर होईल अशी आशा रेल्वेच्या अधिकाऱ्यांना वाटते. गोव्यात मोठ्या संख्येने येणारे पर्यटक या ठिकाणी दूध सागर धबधब्याच्या परिसरातील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटू शकतील.

गोव्यातील मडगाव ते कॅसल रॉक पर्यंतचा रेल्वे मार्ग हा फार पूर्वी वेस्ट ऑफ इंडियन पोर्तुगीज गॅरेंटेड रेल्वे कंपनीच्या (डब्ल्यूआयपीजीआर) रेल्वेमार्गाचा एक भाग होता. कॅसल रॉक ही त्याकाळी ब्रिटिश इंडिया आणि पोर्तुगीज प्रदेश यांच्यामधील सीमेवरील स्थलांतर चौकी होती, असे नैऋत्य रेल्वेचे मुख्य प्रसिद्धी अधिकारी अनिश हेगडे यांनी सांगितले.Dudhsagar falls

पर्यटन क्षेत्राच्या उन्नतीसाठी दूध सागर येथे ज्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामधील रेल्वे स्थानक ते धबधब्यापर्यंतचा पदपथ हा नव्याने पैसे खर्च न करता पर्यावरणपूरक पद्धतीने रेल्वे रुळाचे कॉन्क्रीट स्लीपर्स वापरून तयार करण्यात आला आहे. नैऋत्य रेल्वेने दूधसागर धबधब्या समोरील जागेचे सुशोभीकरण केले असून तेथे पायर्‍यांच्या बागेची (स्टेप्ड गार्डन) उभारणी केली आहे.

पर्यटकांना धबधबा आणि आसपासच्या परिसराच्या नयनरम्य दृश्याचा आराम बसून आनंद लुटता यावा यासाठी तेथे छत असलेल्या बाकड्यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. या जागेत एका वेळी सुमारे 75 लोक सामावू शकतात. पायर्‍यांच्या बागेतील सर्वात उंचावरील पायरीवर असलेल्या ‘व्हुविंग पॉईंट’वरून आपण धबधबा अधिक स्पष्ट आणि चांगल्या प्रकारे पाहू शकतो, असे हेगडे यांनी सांगितले. पर्यटक आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धबधब्याच्या ठिकाणी उंच कड्यावर स्टील ग्रिल्स असलेली पॅरापिट भिंत बांधण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.