अनेक गुन्हेगारी प्रकरणांमधील तपासात पोलीस अधिकाऱ्यांना महत्त्वाचे धागेदोरे मिळवून देऊन गुन्हेगारांपर्यंत पोचविण्यास मदत करणाऱ्या ‘रॅम्बो’ या कर्तव्यदक्ष व राज्यातील ज्येष्ठ पोलीस श्वानाचे आज निधन झाले. पोलीस दलातर्फे रेम्बोला शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला.
पोलीस आयुक्त डाॅ. के. त्यागराजन, उपायुक्त डॉ विक्रम आमटे यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी रॅम्बो या पोलीस श्वानाच्या अंत्यसंस्काराप्रसंगी उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्त त्यागराजन आणि उपायुक्त डॉ आमटे यांनी मृत रेम्बोच्या कलेवराला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पोलीस दलातर्फे शासकीय इतमामात बिगुलसह सशस्त्र मानवंदना देऊन रॅम्बोला अखेरचा निरोप देण्यात आला.
रॅम्बो हे जर्मन शेफर्ड जातीचे श्वान पोलीस दलात दाखल झाल्यानंतर त्याला 2009 -10 साली बेंगलोर येथील पोलीस गुन्हे शाखेतर्फे आडूगोंडी येथे खास प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर सदर श्वानाला बेळगाव शहर पोलिसांच्या श्वान पथकात समाविष्ट करण्यात आले.
तेंव्हापासून आतापर्यंत गेली 12 वर्षे रॅम्बो पोलिस दलात कर्तव्य बजावत होता. खून, दरोडे, चोरी आदी अनेक गुन्हेगारी प्रकरणातील आरोपींना गजाआड करण्यात रॅम्बोने महत्त्वाची भूमिका पार पाडली.
गुन्ह्यांच्या तपास कार्यात रॅम्बो अल्पावधीत महत्त्वाचे धागेदोरे पोलीस अधिकाऱ्यांना मिळवून देत असे. राज्यातील पोलीस श्वानपथकांमधील श्वानांमध्ये रेम्बो हे श्वान वयाने आणि अनुभवाने सर्वात ज्येष्ठ होते असे सांगून सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी सहकार्याने वागत असल्यामुळे रॅम्बो सर्वांना प्रिय होता, अशी माहिती अंत्यसंस्कारानंतर पत्रकारांशी बोलताना पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी दिली.