कोरोना प्रादुर्भावाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका मुलांना असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यासाठी जिल्हा आणि तालुका पातळीवरील हॉस्पिटल्समध्ये मुलांवरील उपचारासाठी आवश्यक ती सर्व तयारी केली जावी, असे उपमुख्यमंत्री व बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी स्पष्ट केले.
गेल्या कांही दिवसातील मुसळधार पावसामुळे क्षतीग्रस्त झालेल्या प्रदेशात हाती घेण्यात आलेल्या उपाययोजना आणि कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणासंदर्भात शहरातील सरकारी विश्रामधाम येथे आज मंगळवारी सकाळी आयोजित अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीमध्ये अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री कारजोळ बोलत होते. जिल्हा आणि तालुका पातळीवरील हॉस्पिटल्स मधील कामकाजाची माहिती घेतल्यानंतर मुलांसाठी कोरोनाची तिसरी लाट धोकादायक असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तेंव्हा मुलांवरील उपचारासाठी आवश्यक औषधांसह वैद्यकीय उपकरणे आदी इतर सर्व तयारी करण्यात यावी असे त्यांनी सांगितले.
तालुक्याच्या हॉस्पिटल्समध्ये मुलांच्या डॉक्टरांनी उपलब्ध राहून आपले कर्तव्य बजावले पाहिजे. या हॉस्पिटल्समध्ये गरज भासल्यास तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली जावी. यासंदर्भात खाजगी डॉक्टरांचे सहकार्य देखील घेतले जावे. आवश्यक औषधांचा तुटवडा निर्माण होणार नाही याकडे लक्ष दिले जावे असे सांगून औषध पुरवठ्या संदर्भात काही समस्या असल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण शेकडा 3 टक्के झाले आहे, हे प्रमाण आणखी कमी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशी सूचना त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली. कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी प्रशंसा करून त्यांचे अभिनंदन केले. तसेच बीम्स हॉस्पिटलमधील कारभार सुधारून तो मार्गी लावत असल्याबद्दल प्रादेशिक आयुक्त आणि बीम्सचे प्रशासक अमलान आदित्य बिश्वास यांचीही त्यांनी प्रशंसा केली.
बळ्ळारी नाल्याच्या सुधारणे संदर्भात 800 कोटी रुपयांची योजना आखण्यात आली असून मंजुरीसाठी ती सरकारकडे धाडण्यात आली आहे. आगामी अर्थसंकल्पात या योजनेला अनुमोदन घेऊन निधी मंजूर करून घेण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे असे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी खासदार मंगला अंगडी यांनी बळ्ळारी नाल्याची समस्या निकालात काढण्यासाठी शाश्वत योजना आखली गेली पाहिजे असे सांगितले.
पूर्वतयारी करण्यात आल्यामुळेच एका दिवसात 1 लाख लोकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली. आगामी काळात जितका अधिक लस पुरवठा होईल तितक्या वेगाने लसीकरण मोहीम यशस्वी केली जाईल. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लोक मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असल्याकारणाने ब्लॅक फंगसमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या थोडी वाढल्याची आणि जिल्ह्यातील 150 खेडेगाव सिल डाऊन केल्यामुळे कोरोना नियंत्रणात येण्यास मदत झाल्याची माहिती जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी दिली.
बैठकीत पालकमंत्र्यांनी कोरोना संदर्भात अन्य माहिती जाणून घेतली. आढावा बैठकीस आमदार ॲड. अनिल बेनके, पोलीस आयुक्त डाॅ. के. त्यागराजन, जिल्हा पंचायत सीईओ दर्शन, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस.व्ही. मुन्याळ, जिल्हा सर्वेक्षणाधिकारी डॉ. बाळकृष्ण तुक्कार आदींसह संबंधित अन्य अधिकारी उपस्थित होते.