कोरोना प्रादुर्भावामुळे प्रभावित झालेल्या जिल्ह्यातील कुटुंबांच्या केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात कोरोना महामारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या लाटेमध्ये 530 मुलांनी आपल्या किमान एका पालकाला गमावले आहे.
सदर मुलांपैकी जवळपास 17 मुले एकेरी पालकत्वाची असून त्यांचे एक पालक कोरोना संसर्गापूर्वीच निधन पावले आहेत. त्यामुळे एकंदर 511 मुलांनी फक्त कोरोनाविषाणूमुळे आपल्या एका पालकाला गमावले आहे.
यासंदर्भात सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल येत्या शनिवारी तयार होणार असून पुढील सोमवारी तो राज्य सरकारकडे सादर केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच संबंधित मुलांपैकी कोणालाही सरकारी बालकल्याण गृह अथवा वस्तीगृहात दाखल करण्यात आलेले नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रवींद्र रत्नाकर यांनी सरकार संबंधित मुलांच्या कुटुंबांना सर्व फायदे उपलब्ध करून देणार आहे अशी माहिती देऊन सरकारी बालकल्याण गृह किंवा निवासी शाळेमध्ये त्या मुलांना दाखल करून घेऊन त्यांची काळजी घेण्याचा आमचा प्रस्ताव कायम खुला राहील, असे स्पष्ट केले.
महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी देखील अनाथ अथवा कोरोनाचा फटका बसलेल्या मुलांचे पालन-पोषण करण्यास सरकार केंव्हाही तयार असल्याचे जाहीर केले आहे.
दरम्यान अनाथ मुलांसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या योजनेअंतर्गत 3 वर्षापर्यंतच्या मुला-मुलींना दरमहा 1000 रुपये प्रोत्साहन दिले जाईल. त्याच प्रमाणे केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत सदर मुले जेंव्हा 18 वर्षाची होतील तेंव्हा त्यांना 1 लाख रुपये मिळतील.