जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली चिंताजनक वाढ लक्षात घेऊन संपूर्ण लॉक डाऊनचा (विकेंड लॉक डाऊन) कालावधी वाढविण्यात आला आहे.
त्यानुसार येत्या शुक्रवार 4 जून रोजी सकाळी 6 वाजल्यापासून सोमवारी 7 जून रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत शहरासह जिल्ह्यात संपूर्ण लॉक डाऊनचा आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी जारी केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या आठवड्यातील संपूर्ण लॉक डाऊन आता शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत लागू असणार आहे. या कालावधीत सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंतच्या भाजीपाला खरेदीवरही निर्बंध असणार आहे.
दूध, ऑनलाइन खाद्यपदार्थ सेवा, औषध दुकाने, तातडीची वैद्यकीय सेवा, परवानगीसह नियोजित विवाह आणि आंतर जिल्हा व आंतरराज्य मालवाहतूक या सेवांना लॉक डाऊनच्या कालावधीत अनुमती असणार आहे.
रेशन दुकाने आणि कृषी सेवा केंद्रे फक्त सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत खुली राहतील. त्याचप्रमाणे रयत केंद्रे दुपारी 12 वाजेपर्यंत खुली राहतील. पीडीओंच्या परवानगीने शेतकऱ्यांना सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत रयत केंद्रामधून बियाणे आणि खतांची खरेदी करता येईल.
संपूर्ण लॉक डाउनच्या काळात भा.दं.वि. 1973 च्या कलम 144 अन्वये रस्त्यावर फिरण्यास बंदी असणार आहे. लॉक डाऊनच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भादवि 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिला आहे.