बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी चौकातील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज मूर्तीचा चौथरा आणि बुरुजांचे विकास काम युद्धपातळीवर हाती घेतले जावे अन्यथा येत्या 5 जुलैपासून आंदोलन छेडले जाईल, असा इशारा बेळगाव जिल्हा शिवसेनेने दिला आहे.
बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर आणि शहर प्रमुख दिलीप बेल्लुरकर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त इशाऱ्याचे निवेदन आज गुरुवारी सकाळी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांना सादर करण्यात आले. निवेदन स्वीकारून आयुक्त आणि योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. धर्मवीर छ. श्री संभाजी महाराज चौक बेळगाव येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौथर्याचे काम गेली 2 वर्षे झाली संथगतीने चालले आहे. हे काम बेळगाव महापालिका, बुडा कार्यालय आणि आमदार निधीतून सुरू आहे. महापालिका अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून हे काम लवकरात लवकर सुरू करून पूर्ण करावे. सदर काम येत्या आठ-दहा दिवसात सुरू झाले नाही तर बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने जुलै 5 तारखेपासून आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदन सादर करतेवेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, शहर प्रमुख दिलीप बेल्लुरकर, वैद्यकीय विभाग प्रमुख दत्ता जाधव, तालुकाप्रमुख सचिन गोरले, उपशहर प्रमुख राजकुमार बोकडे, प्रवीण तेजम, प्रकाश राऊत, राजू तुडयेकर, वैजनाथ भोगन, राजू कणेरी, विनायक जाधव, प्रदीप सुतार, विश्वनाथ येळ्ळूरकर, नारायण पाटील आदी उपस्थित होते.
शहरातील धर्मवीर संभाजी चौक येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीच्या ठिकाणचे सौंदर्यीकरणाचे काम गेल्या 2 वर्षापासून रखडत सुरू आहे. सदर सौंदरी करण्यासाठी बेळगाव शहर विकास प्राधिकरण (बुडा) आणि बेळगाव महापालिकेकडून तसेच आमदार खंडातून निधी मंजूर झाला आहे.
या पद्धतीने निधी मंजूर होऊन देखील सौंदर्यीकरण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. अर्धवट अवस्थेतील या कामामुळे महाराजांच्या मूर्तीच्या परिसराचे सौंदर्य खुलण्या ऐवजी त्या ठिकाणी दगड माती आणि चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे शिवप्रेमींसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नापसंती व्यक्त होत आहे.