कोरोना नियंत्रणात येण्यासाठी विनाकारण रस्त्यावर फिरू नका असे पोलिस प्रशासनाने सातत्याने सांगितले तरी नागरिक मात्र त्याकडे पूर्ण कानाडोळा करत आहेत. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांबाबत पोलिसांनी कठोर पावले उचलत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.
लाॅक डाऊन काळात सरकारने अत्यावश्यक सेवांना मुभा दिली आहे, शिवाय नागरिकांना त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी 6 ते 10 पर्यंत वेळही दिला आहे. या वेळेत तर दररोज नागरिक कमालीची गर्दी करत आहेतच, परंतु दहानंतर सुद्धा ते निष्कारण रस्त्यावर गर्दी करत आहे.
त्यामध्ये तरुणाईचा सहभाग अधिक आहे. औषधाच्या प्रिस्क्रिप्शन जवळ बाळगायची आणि औषधे आणायला जात आहोत असे सांगायचे हा प्रकारही अलीकडे पाहायला मिळत आहे. मात्र चौकशी करताच फसवणूक पोलिसांच्या निदर्शनास येत असल्याने आता पोलीसांनी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू केली आहे.
लाॅक डाऊन काळात विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्त केली जातील असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले होते. त्यानुसार आता चौकाचौकात पोलिस येणार्या-जाणार्या वाहनचालकांची कसून चौकशी करत आहेत.
शिवाय वाहने जप्त करून पोलीस स्थानकात ठेवण्यात येत आहेत. एक तर दंड भरणे अथवा लाॅक डाऊन समाप्त झाल्यानंतर न्यायालयातून आपले वाहन सोडून नेणे, एवढे दोनच पर्याय वाहनधारकांच्या समोर आहेत.
त्यामुळे हे सर्व टाळण्यासाठी विनाकारण रस्त्यावर न फिरता नागरिकांनी विशेष करून युवापिढीने नियमांचे पालन करणे श्रेयस्कर असल्याचे मत पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.