कोरोनामुळे गेल्या पावणे दोन महिन्यांपासून बंद असलेले बेळगावातील पासपोर्ट सेवा केन्द्र (पीओपीएसके) आता राज्यात अनलॉक झाल्यामुळे सोमवार दि. 28 जूनपासून पुन्हा पूर्ववत सुरू केले जाणार आहे.
राज्यात लाॅक डाऊन लागू करण्यात आल्यामुळे बेळगाव शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसच्या मागील बाजूस असलेले पासपोर्ट सेवा केंद्र (पीओपीएसके) गेल्या पावणे दोन महिन्यापासून बंदच आहे.
सदर पासपोर्ट सेवा केंद्राचे गेल्या 14 फेब्रुवारी 2018 साली उद्घाटन करण्यात आले होते. मागील तीन वर्षात या ठिकाणी 25 हजाराहून अधिक जणांनी पासपोर्ट काढून घेतले आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांनी देखील या ठिकाणी पासपोर्ट काढता येत असल्याने बऱ्याच जणांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये लोक डाऊन झाले होते. त्यानंतर सुमारे सहा महिने हे केंद्र बंद होते.
परराष्ट्र मंत्रालयाच्या सुचनेनुसार हे कार्यालय पुन्हा सुरू करण्यात आले. पुढे सहा महिने कोणत्याही अडथळ्याशिवाय सदर कार्यालय सुरू होते. मात्र राज्यात गेल्या 27 एप्रिलपासून विकेंड लॉक डाऊन व कोरोना कर्फ्यू लागू करण्यात आल्यामुळे कार्यालय बंद होते.
राज्यात अद्यापही वीकेंड लॉक डाऊन जारी असल्यामुळे येत्या 28 जूनपासून आठवड्यातील फक्त पाच दिवस हे कार्यालय सुरू असणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी रोज 40 जणांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. तेंव्हा नागरिकांनी ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन पोस्ट अधिक्षक एच. बी. हसबी यांनी केले आहे.