बेळगावचे प्रादेशिक आयुक्त आणि बीम्स हॉस्पिटलचे प्रशासक आमलान आदित्य बिश्वास हे बीम्सचा कारभार मार्गी लावत असून त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देताना बेळगाव शहरातील विविध उद्योजकांनी बीम्सच्या विकासासाठी 22.26 लाख रुपयांची उदार देणगी दिली आहे.
बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्था अर्थात बीम्स हॉस्पिटलच्या विकासासाठी शहरातील जीनबकुळ फोर्ज प्रा. लि. बेळगाव (4,56,000 रु.), जीपीएफ मेटा कास्ट प्रा. लि. बेळगाव (1,25,000 रु.), एंकेस इंजिनीयरिंग प्रा. लि. (1,20,000 रु.), ॲक्वस बेळगाव (10,00,000 रु.), नेतलकर पॉवर ट्रान्समिशन (5,00,000 रु.) आणि डायमंड मेटल स्क्रीन प्रा. लि. बेळगाव (25,000 रु.) यांनी एकूण 22,26,000 रुपयांची देणगी दिली आहे.
या कंपन्यांच्या मालक आणि प्रतिनिधींनी आज सोमवारी सकाळी प्रादेशिक आयुक्त आणि बीम्सचे प्रशासक आमलान आदित्य बिश्वास यांची भेट घेऊन त्यांच्याकडे 22 लाख 26 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
सदर देणगीचा स्विकार करून बोलताना आमलान बिश्वास यांनी बीम्सच्या विकासासाठी हातभार लावण्याच्या सदर उद्योग समूहांच्या कृतीची प्रशंसा करून आभार मानले.
तसेच त्यांनी केलेल्या या अर्थसहाय्यचा बीम्सच्या विकासासाठी योग्य प्रकारे विनियोग केला जाईल, अशी ग्वाही दिली. याप्रसंगी बीम्सचे प्रभारी संचालक डॉ. उमेश के. कुलकर्णी, मुख्य प्रशासकीय अधिकारी एस. एस. बळ्ळारी, जिल्हा कामगार केंद्राचे मुख्य संचालक दोड्ड बसवराज आदी उपस्थित होते.