वनविभागाच्या पथकाने दोस्तीकोप्प बस स्थानकानजीक छापा टाकून बेकायदेशीररित्या हरणाची शिंगे बाळगल्याप्रकरणी दोघा जणांना अटक केली असून त्यांच्याकडील दुचाकी जप्त केली आहे. या कारवाईप्रसंगी अन्य दोघेजण फरारी झाले.
नागेश गुंडाप्पा इटगी व अभिषेक कोरवर (दोघेही रा. देवीकोप्प) अशी अटक केलेल्यांची नांवे आहेत. मात्र बाबू जमादार (रा. हारुगेरी ता. रायबाग) आणि शंकर लक्ष्मण देसाई -पाटील (रा. सांबरा) हे दोघे संशयित फरारी झाले आहेत.
बेळगाव आणि गोलीहळ्ळी वनविभागाने संयुक्तरित्या ही कारवाई केली. वनखात्याच्या कित्तूर सेक्शनच्या व्याप्तीत दास्तीकोप्प बस स्थानकाजवळ दोघेजण हरणाची कवटीसह शिंगे घेऊन थांबले असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानुसार वनविभागाच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली.
जिल्हा वनाधिकारी एम. व्ही. अमरनाथ, सहाय्यक वनरक्षक एम. बी. कुसनाळ, सी. जी. मिरजी यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल शिवानंद मगदूम, प्रशिक्षणार्थी सहाय्यक वनरक्षक चंद्रशेखर पाटील, गोलीहळ्ळीचे वनक्षेत्रपाल श्रीनाथ कडोलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अटक व जप्तीची कारवाई केली. या प्रकरणातील फरारी आरोपींचा शोध जारी आहे.