बळ्ळारी नाल्याच्या शेतात घुसलेल्या पाण्याचा आता निचरा झाला असून जी कांही थोडीफार भात पीकं वाचली आहेत किंवा ज्यांची ऊगवन होत आहे. त्या पिकांच्या पोषणासाठी सध्या युरियाची अत्यंत गरज असली तरी सध्या त्याचा कुठेच स्टॉक नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून शेतकरी सोसायटी आणि कृषी दुकानांमध्ये ते तात्काळ उपलब्ध केले जावे, अशी मागणी केली जात आहे.
कृषी विकासासाठी सरकार व शासकीय अधिकारी खताचा मुबलक साठा असे सांगत असतात. मात्र ऐन हगांमात तो साठा उपलब्ध होत नसल्याने शेतकरी नाराज होत आहे. अलिकडेच मृग नक्षत्राच्या मुसळधार पावसाने सगळीकडे पाणीच पाणी झाल्याने 15 दिवसांपूर्वी खरिप पेरणी केलेली पीकं पाण्याखाली गेली. आता पाऊस थोडा थांबला आहे.
तथापी बळ्ळारी नाल्यातून पाण्याचा निचरा होत नसल्याने अनेक शेतातील पाणी तसेच थांबून आहे. त्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जिथे जमेल तेथील जलपर्णी काढलीतरी बराच पाण्याचा निचरा होऊ शकतो. हे गेल्यावर्षी दिसून आलेच आहे. त्यासाठी शासनाने आतापासूनच प्रयत्न करुन जलपर्णी काढल्यास संपूर्ण बळ्ळारी नाला परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा दिल्यासारखे होणार आहे.
दुसरी गोष्ट ज्या शेतातील पाण्याचा निचरा झाला आहे. त्या शेतात सध्या थोडी,थोडी पीकं आहेत किंवा त्यांची उगवण होत आहे. मात्र ओलीच्या थंडीने त्यांची वाढ खुंटली आहे. ही वाढ होण्यासाठी नायट्रोजन म्हणजे युरियाची गरज आहे.
युरिया प्रमाणात मारल्यास ते भात उगवणीस पोषक ठरते. त्यामुळे सध्या शेतकरी युरियासाठी धडपडत आहेत. तथापि शेतकरी सोसायटी अथवा कृषी दूकानांमध्ये कुठेच युरिया शिल्लक नाही. त्यामूळे असलेली पीकंही नष्ट होतात कि काय? याच चिंतेत शेतकरी सापडले आहेत.
यासंदर्भात शेतकऱ्यांनी कृषी खात्याशी संपर्क साधल्यास आश्वसनाशिवाय कांहीच मिळत नाही. तेंव्हा शासकीय तसेच कृषी संबधीत अधिकाऱ्यांनी जाणिवपूर्वक ताबडतोब प्रत्येक ठिकाणी युरियाचा साठा पुरवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी समस्त शेतकरी वर्गाची मागणी आहे.