स्थानिक नगर विकास योजनेसह अन्य योजना अंतर्गत हाती घेतलेल्या अनेक विकास कामांच्या ठिकाणी आपली छायाचित्रे लावून त्या कामांचे श्रेय लाटण्याचे काम लोकप्रतिनिधी करत असतात. मात्र यापुढे असे प्रकार करता येणार नाहीत.
यापुढे कोणत्याही विकास कामाच्या ठिकाणी लोकप्रतिनिधींची छायाचित्रे लावली जाणार नाहीत याकडे अधिकारी वर्गाने लक्ष द्यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केली आहे.
परिवहन खात्याच्या बऱ्याच बस थांब्यावर लोकप्रतिनिधींचे छायाचित्रे लावण्यात आली आहेत. तसेच अनेक विकास कामांची पूर्तता होताच त्या ठिकाणी संबंधित विभागातील प्रतिनिधींची छायाचित्रे लावण्यात येत आहेत.
मात्र असे प्रकार नियमाविरुद्ध असून सरकारी विकास कामांच्या ठिकाणी केवळ त्या कामासंबंधी माहिती असणारे फलक किंवा छायाचित्रे लावण्यात यावीत, अशी मागणी माहिती हक्क कार्यकर्ते भीमप्पा गडाद यांनी केली होती.
त्यानुसार जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकांऱ्याद्वारे जिल्ह्यातील पंचायत राज्य खात्याच्या बेळगाव व चिक्कोडी विभागाचे कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, महापालिका आयुक्त, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी, प्रांताधिकारी आदींना सुचना केली आहे.