राज्यात म्हैसूर जिल्हा वगळता सर्व ठिकाणचा लाॅक डाऊन हटवण्यात आला आहे. परिणामी आज सोमवार 21 जूनपासून बेळगाव अनलॉक झाल्यामुळे नागरिक विशेषतः व्यापारी गेल्या 52 दिवसांच्या घरातील बंदिवासातून मुक्त झाले असून शहरवासियांमध्ये नवचैतन्य पहावयास मिळत आहे.
लाॅक डाऊनमुळे शहरासह जिल्ह्यातील नागरिक खास करून व्यापाऱ्यांना गेले 52 दिवस आपापली दुकाने बंद ठेवून घरात बसावे लागले होते. मात्र आजपासून जिल्हा अनलॉक झाल्यामुळे घरातील बंदिवासातून मुक्त होऊन सर्वजण एक प्रकारे स्वातंत्र्याची अनुभूती घेऊ लागले आहेत. जिल्ह्यातील सर्व जनतेने आजपासून पुन्हा आपल्या सर्वसामान्य नित्य जीवनक्रमास सुरुवात केली आहे. बेळगाव शहरात तर आज सकाळपासून नागरिकात एक वेगळाच उत्साह आणि आनंद दिसून येत होता.
व्यापारी आणि दुकानदारांना कालपासूनच केंव्हा एकदा सोमवार उजाडतो आणि आपण आपले दुकान उघडतो असे झाले होते. त्यामुळे आज सकाळी लवकर व्यापारी व दुकानदारांनी गेले 52 दिवस बंद असलेल्या आपल्या दुकानांची दारे उघडली आणि डोळे भरून आपल्या दुकानाचे दर्शन घेतले. त्यानंतर दुकानाची साफसफाई व मांडणी करून देव पूजेनंतर प्रत्येकजण व्यापारासाठी सज्ज झालेला पहावयास मिळाला. शहरातील रविवार पेठ, गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, भेंडीबाजार आदी भागातील दुकाने खुली झाल्यामुळे शहरात एक प्रकारे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आज सकाळपासूनच कापड दुकाने, चप्पल दुकाने वगैरे इतर दुकानांमध्ये ग्राहक खरेदीसाठी दाखल झालेले दिसत होते.
आंतरराष्ट्रीय योग दिन असल्यामुळे शहरातील उद्याने आणि मैदानावर आज सकाळी व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्याही जास्त दिसत होती. बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकातून गेले 2 महिने बंद असलेली परिवहन बस सेवा देखील पुनश्च सुरू झाली आहे. आज सकाळपासून कोरोनाच्या नियमांसह आसन क्षमतेपेक्षा 50 टक्के कमी प्रवासी या नियमाचे पालन करत शहरातील रस्त्यांवर बसेस धावू लागल्या आहेत.
एकंदर 52 दिवसाच्या वनवासानंतर बेळगाववासियांनी नव्या उत्साहाने पुनश्च आपली नेहमीची दिनचर्या सुरू केली आहे. तथापि लॉकडाउन समाप्त झाला असला तरी कोरोना प्रादुर्भाव संपलेला नाही. तेंव्हा प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे असून सर्वांनी फेस मास्क सामाजिक अंतराचे भान बाळगून कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूचीचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.