माझा जन्म 1951चा. स्वतंत्र भारतात जन्म झाला,पण ज्या बेळगावात लहानाची मोठी झाले, ते बेळगाव शहर आणि सीमा भाग मात्र महाराष्ट्रात आला नाही हे,मराठीचा अभिमान बाळगणाऱ्या माझ्या मनाला कुठेतरी बोचत राहिल हे नक्की.1979मध्ये लग्न झाल्यावर ठाण्यात 7वर्ष,डोंबिवलीत 31वर्ष,आणि आता नवी मुंबईत 4 वर्षापासून आहोत. तरीही बेळगाव मनातून जाणं अशक्य!
जे बेळगाव सोडून बाहेर कुठेही राहत असतील त्या सर्व मराठी लोकांच्या मनात आज बेळगाव बद्दल याच भावना असतील हे निश्चित. बेळगाव शहर आहेच तसं,निदान मी तरी कधीच विसरू शकत नाही.शाळेत, घरात जसे आपल्यावर संस्कार होतात तसे आपण राहतो त्या शहराचे, गावाचे संस्कारही आपल्यावर नकळत का होईना पण होत असतात. प्रत्येक गावाची एक विशिष्ट भाषा,संस्कृती असते.तशी बेळगावची कानडी मराठी मिश्र संस्कृती बनत गेली आहे.
गोवा,कारवार,कोल्हापूर ,सावंतवाडी,वेंगुर्ला येथील बरेच लोक बेळगावात (फार पूर्वीपासून)राहतात तेही बेळगावच्या संस्कृतीत मिसळून गेले आहेत.आम्हीही मूळचे गोव्याचे पण बेळगाव हेच आमचं गाव झालं.
आयुष्यातला महत्त्वाचा,रम्यकाळ म्हणजे
बालपणीचा.तो बेळगावात व्यतीत झाल्यामुळे,त्या सर्व आठवणी स्मृतीकरंडकात जपून ठेवल्या आहेत. बेळगावची मराठी भाषा कानावर पडली,की त्या सगळ्या आठवणींना पुनश्च उजाळा मिळतो.माझ्या दोन बहिणी लग्न होऊन तिथंच आहेत,माझी आई तिथं आहे,त्यामुळे संधी मिळाली की ,मी आणि माझी रोह्यात राहणारी बहिण दोघी बेळगावला जातोच.
बेळगाव हे गरिबांचं महाबळेश्वर असं म्हटलं जायचं.तर कोणी सेवानिवृत्तांचं ठिकाण म्हणून संबोधत असत.याचं कारण तिथली आल्हाददायक थंड हवा.पावसाळ्यात आणि हिवाळ्यात खूप थंडी .गरम कपड्याशिवाय पर्याय नसतो. पंख्यांची मुंबई सारखी गरज पडत नाही.पण आता तिथंही घरात आणि इतरत्रही पंखे दिसत आहेत.पर्यावरणातला बदल हळूहळू सर्वत्र होत आहे.बेळगावचा ताजा भाजीपाला,ताजं उत्तम लोणी,कुंदा,या गोष्टी तर खास आहेतच.परंतु तिथली लांबलचक घरं समोर दारात उभं राहिलं तर पाठीमागचं परसू दिसतं.जुने वाडे,तर आता नव्याने बांधण्यात आलेले एकाहून एक सुरेख बंगले,पाहात रहावेत असेच आहेत.टिळकवाडी,हिंदवाडीच्या परिसरात फेरी मारली की याची प्रचिती येते.
आता आता अनेक वसाहती नव्याने झाल्या आहेत ती नगरं आम्हाला माहीत नाहीत. परंतु मुख्य बेळगावचा मध्यवस्तीतील भाग हा गल्ली- बोळांचा. हे सर्व आम्हाला लहानपणी परिचयाचे होते.बहुतेक गल्ल्या देवदेवतांच्या नावानं आहेत.आमची रामदेव गल्ली,मारूती गल्ली,गणपत गल्ली,समादेवी गल्ली,बसवाण गल्ली,अश्या अनेक!पण आता आमच्या काळातलं बेळगाव आणि सध्याचं बेळगाव यात विलक्षण फरक झालेला आहे.तसं तर आता सर्वच शहरांची रूपं पार बदलली आहेत. बेळगावात कोणाच्याही घरात गेल्यास पोह्यांचा खमंग वास नक्कीच येतो.पोह्यांचे प्रकार तरी किती,दडपे पोहे,लावलेले पोहे(तिखटमीठ),ताकातले पोहे,पोह्यांचा आलेपाक(जो ऊसाच्या रसाबरोबर खाल्ला जातो) आणि ते आलेल्या पाहुण्याला आग्रहानं,प्रेमानं खाऊ घालतात. बेळगावच्या सारस्वत समाजाची खासियत तांदळाच्या पीठाची लोणी घालून बनवलेली कडबोळी. कानडी लोकांचे तंबीटाचे लाडू.आम्ही लहान असताना शेजारी कन्नड बिऱ्हाडं होती,त्यांची मराठी आणि आमची कानडी दोन्ही दिव्यच!आता हसू येतं.
एकंदरीत या दोन्ही भाषांचा एकमेकांवर प्रभाव होऊन बेळगावी मराठी विशेष हेल काढून बोलण्याची लकब निर्माण झाली असावी.आपलं मराठी भाषेचं दैवत पु.ल.देशपांडे बेळगावच्या आर पी डी काॅलेजमध्ये काही वर्ष मराठीचे प्रोफेसर होते.त्यांनी आपल्या पुस्तकांतून,बेळगावी मराठी अगदी छान लिहिली आहे.खास करून नाटकातली बेळगावी मराठी बोलणारी पात्रं.कवी निकुंब,इंदिरा संत हेही बेळगावचे हे सांगण्यात नक्कीच अभिमान वाटतो .
बेळगावात सुंदर तलाव तर आहेतच.त्याशिवाय छ.शिवरायांच्या काळातला भुईकोट किल्ला,यळ्ळूरगड बेळगावच्या आदरणीय ऐतिहासिक वास्तू पाहण्यासारख्या आहेत. मराठा लाईफ इन्फन्टरी,मिलीटरी ट्रेनिंग सेंटर,मस्त बेळगावकरांना अभिमानाची बाब आहे. मराठी सिनेमा,आणि नाटकं बेळगावात हौसफूल्ल चालायची. सगळं वातावरण मराठीमय होतं.तिथल्या वाड़मय चर्चामंडळाचे उपक्रम उल्लेखनीय असायचे.याच बरोबर सीमाभागातील मराठी लोकांचा महाराष्ट्रात विलीन होण्यासाठीचा लढाही चालू होता.आचार्य अत्रे,बॅ.नाथ पै,यांच्या सभा बेळगावात नेहमी व्हायच्या.त्यांना पहाण्याचा, आणि त्यांचं वक्तृत्व ऐकण्याचं भाग्य मला मिळालं.आचार्य अत्रेंच्या सभा ह्वायच्या तेव्हा मी लहान होते.वडिलांबरोबर, आजीबरोबर मला जायला मिळायचं.त्या दोघांनाही आवड होती.माझे वडील सीमाभागातील नेत्यांना चांगले ओळखत होते.
त्यांच्या बरोबर,सभा,सत्याग्रह, चळवळींना उपस्थित असायचे.परंतु टेलरिंग दुकान सांभाळून पूर्णवेळ सहभाग देणं शक्य नव्हतं .बर्याच वेळेला मग आईला दुकानात थांबावं लागायचं. सीमाभागात वारंवार मोठमोठ्या नेत्यांच्या सभा व्हायच्या.मी बॅ.नाथ पै यांच्या सभांना जायची तेव्हा नुकतीच शिक्षिका म्हणून कामावर रूजू झाले होते.बॅ.नाथ पै,यांचीअखेरची सभा खूप गाजली होती.अत्यंत आवेशपूर्ण एक तासापेक्षाही जास्त वेळ ते बोलत होते आणि सर्व श्रोते तल्लीन होऊन ऐकत होते.मीही अतिशय मन लावून त्यांचं ते भाषण ऐकत होते.हे त्यांचं अखेरचं भाषण ठरलं.त्याच रात्री त्यांचं निधन झालं .असे अनेक थोर नेते बेळगाव प्रश्नासाठी अतोनात झटले.त्या सर्वांची नावं देणं अशक्य आहे.कितीतरी लोकांना या लढ्यात शहीदही व्हावं लागलं.गेली अनेक वर्षे हा लढा जोमानं चालू राहिला. बेळगावातून सर्व प्रतिनीधी मराठी लोकच निवडून दिले जायचे.तरीही हा लढा अयशस्वी ठरला.केंद्रात किती सत्तांतर झाली,परंतु सीमाभागातील लोकांवर होणारा अन्याय कोणी दूर करू शकलं नाही.
आता बेळगावात कर्नाटक सरकारनी अनेक विभागीय कार्यालयं हलवली आहेत,त्यामुळे साहजिकच कन्नड भाषिकांची संख्या वाढत गेली.आता मराठी प्रतिनिधी निवडून येणं कठीण झालं आहे.कन्नड सक्तीचं केल्यामुळे सरकारी कार्यालयातील मराठी कर्मचारी,शालेय विद्य्यार्थी कन्नड शिकू लागले.सगळे फलक कन्नड मधून लावले गेलेत.यात कन्नड भाषेचा कोणाही मराठी माणसाला द्वेष नाही,आणि तो नसावाही! परंतु सक्ती केल्यामुळेच लोकांचा राग अजूनही आहे.अजूनही सीमाभागातील मराठी भाषिकांची आशा मावळली नाही ,परंतु लढ्याला पूर्ववत नेतृत्व नाही.देशापुढील अनेक इतर समस्यांची ढाल पुढे करत सीमाप्रश्न डावलला गेला.आता तिथल्या मराठी जनतेचाही नाईलाज आहे. आता तर बेळगाव शहर ही कर्नाटक राज्याची दुसरी राजधानी बनली आहे.अत्यंत सुंदर असं विधान-भवन तिथं डौलानं उभारण्यात आलंय.आणि अर्थातच हळूहळू बेळगावंचं राजकीय ,सामाजिक रूप बदलता बदलता कधी ‘बेळगावी’ असं नामकरण झालं कळलंही नाही!
हे नवीन बारसं झालं असलं तरी,’बेळगाव ‘ हे वर्षानुवर्ष तोंडी असलेलं नाव जाणं शक्य नाही.कायद्यानुसार हे झालेलं नामांतर सर्वानांच स्वीकारावं लागेल. पण बेळगाव हे मनातून जाणं कठीण आहे.
सौ.माधवी माळगांवकर
(लेखिका या महाराष्ट्र शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त डोंबिवली येथील निवृत्त शिक्षिका आहेत.)