बेळगावमध्ये 200 कोटी रुपये खर्चाचा मॅन्युफॅक्चरिंग कॅम्पस उभारण्यासाठी आपला कर्नाटक सरकारची सामंजस्य करार झाला असल्याची माहिती बालू फोर्ज इंडस्ट्रीजने आज मंगळवारी दिली.
आमचा कर्नाटक सरकारशी सामंजस्य करार झाला असून त्यानुसार बेळगावातील 25 एकर जागेमध्ये कंपनी मॅन्युफॅक्चरिंग कॅम्पसची उभारणी केली जाणार आहे. सदर प्रकल्प तीन वर्षाच्या कालावधीत पूर्ण केला जाणार असून त्यासाठी 200 कोटी रुपये इतके नियोजित भांडवल लागणार आहे.
तसेच इन्व्हेस्ट कर्नाटक फोरमचे सीईओ आणि औद्योगिक विकास आयुक्त गुंजन कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प उभारला जाणार आहे, असे बालू फोर्ज इंडस्ट्रीजकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बेळगावात बालू फोर्ज इंडस्ट्रीजची सुरुवात 1990 साली झाली. प्रारंभी त्यांच्याकडे मर्यादित मनुष्यबळाच्या सहाय्याने सिलेंडर्ससाठी क्रॅन्कशाफ्ट बनविले जात होते. मात्र गेल्या दशकभरात या कंपनीने झपाट्याने प्रगती साधली आहे.
सध्या जगातील सुमारे 80 देशात बालू फोर्ज इंडस्ट्रीजच्या उत्पादनांची विक्री होते. 1990मध्ये बालू ही देशातील एकमेव अशी कंपनी होती जी ट्रॅक्टर, ट्रक आणि प्रवासी गाड्यांसाठी लागणाऱ्या क्रॅन्कशाफ्टचे प्रचंड उत्पादन करत होती. पुढे दोन दशकांनंतर आता या कंपनीने जागतिक बाजारपेठेत आपली अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.