कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनमुळे निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते सचिन बाळेकुंद्री यांनी स्वखर्चाने बाची गावातील गरजू कुटुंबांना आज जीवनावश्यक साहित्याच्या रेशन किट्सचे वाटप केले.
सामाजिक कार्यकर्ते सचिन बाळेकुंद्री यांनी आपल्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त बाची गावामध्ये हा जीवनावश्यक साहित्याच्या रेशन किट्स वाटपाचा उपक्रम राबविला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावच्या खासदार मंगला सुरेश अंगडी खास उपस्थितीत होत्या.
त्यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रेशन किट्सचे वाटप करण्यात आले. खासदार मंगला अंगडी यांनी यावेळी सचिन बाळेकुंद्री यांच्या सामाजिक बांधीलकीबद्दल प्रशंसोद्गार काढले. गावातील अनेक गरजू कुटुंबांनी या रेशन कीट वाटप उपक्रमाचा लाभ घेऊन सचिन बाळेकुंद्री यांना दुवा दिला.
खासदारांव्यतिरिक्त या कार्यक्रमाला बेळगाव जिल्हा भाजप अध्यक्ष माजी आमदार संजय पाटील, ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, माजी महापौर शिवाजी सुंठकर, चेतन अंगडी, माजी आमदार मनोहर कडोलकर, ग्रामीणचे माजी अध्यक्ष विनय कदम, ज्योतिबा दोड्डण्णावर आदींसह बाची ग्रामस्थ उपस्थित होते.
रेशन किट्स वाटप उपक्रमाचे औचित्य साधून ओमकार ट्रेडर्स शिनोळी यांच्याकडून संपूर्ण बाची ग्रामस्थांमध्ये शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या आयुर्वेदिक औषधाचे मोफत वाटप करण्यात आले.