बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची (एपीएमसी) शहरात दोन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेली दोन्ही भाजी मार्केट आता येत्या सोमवार दि. 21 जूनपासून पुन्हा पूर्ववत एपीएमसी मध्येच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक अंतरासह कांही नियम व अटींचे पालन करून व्यापाऱ्यांना एपीएमसीमध्ये मार्केट सुरू करण्यास परवानगी दिली जाणार आहे.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या अध्यक्षतेखाली काल बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये उपरोक्त निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांच्यासह एपीएमसी समितीचे सदस्य आणि व्यापारी उपस्थित होते. बैठकीत नियम व अटी लागू करून एपीएमसीमध्ये भाजी मार्केट सुरू करण्याला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली. तसेच तातडीने व्यापार्यांची बैठक घेऊन सूचना करण्यास सांगितले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर दुपारी एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम, सदस्य महेश कुगजी, निंगाप्पा जाधव आदींच्या उपस्थितीत एपीएमसी येथे व्यापाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाची माहिती देण्यात आली.
एपीएमसी भाजी मार्केटमध्ये ए, बी व सी ब्लॉक असून या ठिकाणी 130 हून अधिक दुकान गाळे आहेत. व्यापाऱ्यांना मधला एकेक गाळा सोडून, म्हणजे एक सोडून एक गाळ्यांमध्ये भाजी विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे इतर व्यापाऱ्यांनाही एपीएमसी मध्येच दुसऱ्या ठिकाणी गाळे देण्याचा निर्णय देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सामाजिक अंतर, कायम मास्क वापरणे आदी सूचनाही यावेळी करण्यात आला. बैठकीस व्यापारी सतीश पाटील, बसनगौडा पाटील, विनोद राजगोळकर, जावेद सनदी, दिवाकर पाटील के. के. बागवान, मोहन मन्नोळकर आदी उपस्थित होते.
एपीएमसी भाजी मार्केटमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी दोन महिन्यापूर्वी सदर भाजी मार्केटचे शहरात दोन ठिकाणी स्थलांतर केले होते. मात्र पावसामध्ये व्यापाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागण्याबरोबरच भाजीपाल्यांचे नुकसान होत होते. त्यामुळे भाजी मार्केटचे पुन्हा एपीएमसीमध्ये स्थलांतर करण्याची मागणी जोर धरू लागली होती. आता अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी या स्थलांतराला परवानगी दिली असल्याने व्यापारातून समाधान व्यक्त होत आहे.