मासेमारीसाठी गेलेल्या एका मुलाचा जमिनीवर पडलेल्या जीवंत विद्युत वाहिनीतील विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाल्याची घटना अनगोळ तलावाच्या ठिकाणी आज गुरुवारी सकाळी घडली.
विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी मुलाचे नांव विकास संजू मोघेरा (वय 14 वर्षे, रा. अनगोळ) असे आहे. विकास हा आज सकाळी अनगोळ येथील तलावाच्या ठिकाणी मासे पकडण्यासाठी गेला होता.
त्यावेळी तलावाच्या काठा शेजारील गवत झाडाझुडुपांमध्ये तुटून पडलेल्या जिवंत विद्युत वाहिनीला स्पर्श होऊन विजेच्या धक्क्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकाराची माहिती मिळताच टिळकवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक एम. वाय. काळीमनी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.
तसेच विकास मोगेरा याचा मृतदेह शवचिकीत्सेसाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे धाडला. सदर घटनेची टिळकवाडी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
या मुलाचा अंत्यविधीचा खर्च सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांच्या हेल्प फॉर नीडी या संघटनेने उचलत सामाजिक बांधिलकी जपली आहे