बेळगाव तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांची बदामी येथे बदली झाली आहे. आता तालुका पंचायत कारभार प्रांताधिकारी यांच्यावर देण्यात आला आहे. मात्र त्यांना इतर कामे असल्याने त्यांचे तालुका पंचायतकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे तालुका पंचायत मधील कारभार आता रामभरोसे झाला आहे. त्यामुळे येथे कार्यकारी अधिकार्यांची नेमणूक करावी अशी मागणी होत आहे.
बेळगाव तालुक्यात एक प्रामाणिक अधिकारी म्हणून मल्लिकार्जुन कलादगी यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र आता त्यांची बदली झाल्याने येथील कारभार सुरळीत चालत नसल्याचे दिसून येत आहे. तालुका पंचायत मधील अधिकारी मनमानी कारभार करत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
सध्या कोरोना महामारीमुळे अधिक तर नागरिक घरीच आहेत. त्यामुळे सध्या तालुका पंचायत मध्ये गर्दी होत नसली तरी अनलॉक सुरू झाल्यानंतर मात्र नागरिकांची झुंबड उडणार आहे. प्रांताधिकारी यांना ही अनेक कामे असल्याने त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांची कामे करणार कोण? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रशासनाने या ठिकाणी कार्यकारी अधिकारी नेमावी अशी मागणी होत आहे.
तालुका पंचायत मधील अनेक अधिकारी वर्ग ऑफिसमध्ये गैरहजर असल्याचे चित्र सध्यातरी पहावयास मिळत आहे. कार्यकारी अधिकारी नसले तर कार्यालयाची जबाबदारी व्यवस्थापकवर असते. मात्र व्यवस्थापक ही सुट्टीवर असल्याने मोठा गदारोळ माजत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे याठिकाणी कार्यकारी अधिकाऱ्यांची तातडीने नेमणूक करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.