संपूर्ण राज्यासह बेळगाव पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटाला तोंड देत असून कोरोनाविषाणूच्या दुसऱ्या लाटेने कर्नाटकात थैमान घातले आहे. परिस्थिती पुन्हा एकदा चिंताजनक बनल्यामुळे सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधचाच एक भाग म्हणून आठवड्याच्या शेवटी बाहेर पडणारी गर्दी रोखण्यासाठी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी ‘विकेंड लाॅक डाऊन’ लागू केला आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट पसरला असून वाहनांच्या रहदारी अभावी रस्ते भकास दिसत आहेत.
राज्यात कोरोनाची दुसरी लाटेचा तडाखा बेळगावला ही बसला असून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. बेळगावात गेल्या कांही दिवसांपासून दिवसाकाठी तब्बल एक -दोन हजाराच्या सरासरीने बाधित रुग्ण आढळून येत आहेत. दुसरीकडे राज्यात 30 ते 50 हजाराच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. प्रचंड वेगाने होत असलेले विषाणू संक्रमण आणि वाढणाऱ्या रुग्ण संख्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने लाॅक डाऊनचा निर्बंध आणखी 14 दिवस 7 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
बेळगावातील पहिल्या विकेंड लॉक डाऊनला आज 22 मेपासून सुरुवात झाली आहे. परिणामी पुन्हा एकदा गर्दीने वाहणारे बेळगावचे रस्ते सामसूम झालेले दिसत आहेत. बेळगाव पोलीस आणि महापालिकेने गर्दी रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेतले असून पोलिसांकडून लाॅक डाऊनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. लाॅक डाऊनची सुरुवात झाल्यापासूनच त्याचा प्रभाव दिसून येत असून शनिवारी सकाळी वाहनांची वर्दळ असणाऱ्या रस्ते सामसूम दिसत होते. विकेण्डच्या दिवशी गर्दीने फुलून जाणाऱ्या बेळगावातील बाजारपेठेत निरव शांतता होती. विनाकारण फिरणाऱ्यांवर बंदी घालण्यात आलेली आहे. याचा परिणामही दिसून येत आहे. रस्त्यावर दिसणाऱ्या वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. अत्यावश्यक सेवेतील लोकांच्या संचाराला अनुमती दिली जात असून विनाकारण फिरणाऱ्यांना पुन्हा घरी पाठवले जात आहे.
गणपत गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली, रविवार पेठ, डी मार्ट, शहापूर खडेबाजार, खासबाग भाजी मार्केट अशी ठिकाणे विकेंडला गर्दीने फुलून जातात. त्यामुळे खास करून अशा ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आलेले आहेत.
लाॅक डाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याने सरकारने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांवर कोणतेही निर्बंध घातले नाहीत. बेळगावला इतर शहरांशी जोडणार महामार्गावर देखील वाहनांची तुरळक रहदारी पहावयास मिळाली. शहराबरोबरच बेळगावातील महामार्गावर देखील पोलिस तैनात करण्यात आलेले आहेत. ऐरवी वाहतूक कोंडीने चर्चेत असणारे रस्ते आज वाहनांअभावी भकास दिसत आहेत.