अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे काल रात्रीपासून बेळगाव शहराला जोडणाऱ्या वादळी वाऱ्यासह संततधार पावसामुळे शहरातील ऑटोनगर आणि सीपीएड येथील भाजी मार्केटची वाताहत झाली असून या ठिकाणी पाण्याची तळ्यांसह चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी भाजीपाला चिखल मातीत भिजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
काल रात्रीपासून वादळी वाऱ्यासह पडत असलेल्या पावसामुळे शहरातील ऑटोनगर आणि सीपीएड मैदान येथे सुरू करण्यात आलेल्या भाजी मार्केटची पार दैना उडाली आहे. संततधार पावसामुळे या भाजी मार्केटमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले असून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
चिखलाच्या दलदली मुळे याठिकाणी ये-जा करणे कठीण झाले आहे. या भाजी मार्केटमध्ये साठा करून ठेवण्यात आलेला भाजीपाला चिखल मातीत भिजून खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे.
काल रात्रीपासून पावसाच्या पाण्यात भिजत पडल्यामुळे खराब झालेला भाजीपाला शेतकऱ्यांना कचर्यात फेकून द्यावा लागत आहे. यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरण्याबरोबरच फेकून देण्यात आलेल्या खराब भाजीपाल्यामुळे भाजी मार्केट परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.
ऑटोनगर आणि सीपीएड मैदानावरील या भाजी मार्केटच्या दुकान गाळ्यांच्या शेडमध्ये पाणी साचून राहिले असल्यामुळे येथील भाजी खरेदी विक्री पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी शेतकरी आणि व्यापारी वर्ग चिंतातुर झाला आहे.