श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावचे धारकरी, दुर्गवीर कंग्राळ गल्ली येथील नरेश शिवाजीराव जाधव यांनी पेनच्या टोकावर बसवता येईल असा छोटा जिरेटोप बनवून तो छत्रपती श्री. शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज छत्रपती श्री. उदयनमहाराज भोसले (सातारा) यांना भेट म्हणून पाठवला होता.
याची दखल घेऊन उदयन महाराजांनी नरेशला स्वतः पत्र पाठवून अभिनंदन केले असून शुभेच्छा दिल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज पदस्पर्शाने पावन झालेल्या हिंदुस्तान क्षेत्रातील एक शिवप्रेमी म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कथेतून प्रेरणा घेऊन जिरेटोप बनविला आहे. पेनाच्या टोकावर बसवण्यात येईल अशा स्वरूपाचा हा जिरेटोप आपण आम्हाला भेट म्हणून सादर केला.
याचा आम्ही स्वीकार केला असून आपण सादर केलेल्या सुबक व सुंदर अशा या भेटवस्तूसाठी आमच्याकडून शुभेच्छा! असा मजकूर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या शुभेच्छा पत्रात नमूद आहे.
शिवरायांचे वंशज असणाऱ्या खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या या शुभेच्छा पत्राच्या स्वरूपातील शाबासकीबद्दल नरेश शिवाजीराव जाधव याचे सर्वत्र कौतुक होत आहे.