बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीमध्ये सुमारे 5 हजार मतांच्या फरकाने भाजपच्या मंगला अंगडी यांचा विजय झाला. काँग्रेसचे केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी मंगला अंगडी यांना जोरदार टक्कर दिली मात्र विजयाने त्यांना हुलकावणी दिली. तर दुसरीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळके यांनी लाखावर मते घेतल्याने तोही एक चर्चेचा विषय झाला होता. मात्र आता मंगला अंगडी यांचा विजय आणि सतीश जारकीहोळी यांचा पराभव तसेच शुभम शेळके यांनी घेतलेली विक्रमी मते यावर विश्लेषणात्मक चर्चा होताना दिसून येत आहे.
काँग्रेस उमेदवार सतीश जारकीहोळी यांच्या पराभवाची मुख्य कारणे कोणती आहेत यावर सध्या अधिक चर्चा होत आहे. जारकीहोळी यांच्या पराभवाची पहिली दोन मुख्य कारणे म्हणजे सतीश जारकीहोळी हे जरी मूळ गोकाकचे रहिवासी असले तरी गेल्या 20 वर्षांपासून ते यमकनमर्डी मतदार संघातून विधानसभेत निवडून जात आहेत.
यमकनमर्डीचे आमदार असणाऱ्या सतीश जारकीहोळी यांचे मोठे बंधू रमेश जारकीहोळी मागील चार वेळा पहिला कॉंग्रेसमधून आणि आता भाजपमधून गोकाकचे आमदार झाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत सतीश जारकीहोळी यांना गोकाकमध्ये तसा वरचष्मा मिळवता आला नाही. त्याउलट रमेश जारकीहोळी यांनी भाजपला 28 हजार हजार मतांची आघाडी मिळवून दिली ती आघाडी सतीश जारकीहोळी यांच्या पराभवास आणि मंगला अंगडी यांच्या विजयास कारणीभूत ठरली असल्याचे जाणकारांचे मत आहे.
जारकीहोळी यांच्या पराभवाचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे बेळगाव ग्रामीण मतदारसंघांमध्ये काँग्रेसला मतदारांकडून झालेला दगाफटका हे होय. या मतदारसंघात लक्ष्मी हेब्बाळकर या काँग्रेसच्या विद्यमान आमदार आहेत. त्यांना या मतदारसंघात 1 लाख 2 हजार मते पडली होती. मात्र मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी लक्ष्मी हेब्बाळकर यांना काँग्रेसला म्हणावीत अशी आघाडी मिळवून देता आली नाही.
बेळगाव दक्षिण मतदारसंघात झालेली पीछेहाट हे सतीश जारकीहोळी यांच्या पराभवाचे तिसरे कारण असल्याचे म्हंटले जाते. बेळगाव दक्षिण मतदारसंघांमध्ये भाजपला मागील वेळी 1 लाख 17 हजार मते पडली होती.
मात्र यावेळी त्यांना फक्त 53 हजार मतांवर समाधान मानावे लागले आहे. मात्र तरीही येथे भाजपला 22 हजार मतांची आघाडी मिळवता आली जी काँग्रेसला महागात पडली. एकंदर गोकाकमधील अंगडी यांची 27 हजार मतांची आघाडी आणि बेळगाव ग्रामीण व दक्षिण मतदारसंघातील काँग्रेसची पीछेहाट या गोष्टीच सतीश जारकीहोळी यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे जाणकार आणि विश्लेषकांचे मत आहे.