गोवा येथे फसवणूक झाल्यानंतर कसेबसे बेळगाव गाठणाऱ्या उत्तराखंड आणि मुंबई येथील दोघा असहाय्य कामगारांना मदतीचा हात देताना बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते विनायक केसरकर यांनी त्या उभयतांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या सध्याच्या बिकट परिस्थितीत त्यांना त्यांच्या गावी सुखरूप पोहोचवण्याची व्यवस्था केली.
उत्तराखंड येथील दिनेश सिंग आणि मुंबई येथील भाऊसाहेब घोदे हे दोघेजण कामानिमित्त गोव्याला गेले होते. परंतु गोवा येथे फसवणूक झाल्यामुळे ते कसेबसे थेट बेळगावात येऊन पोहोचले. तेंव्हा खिशात फक्त 100 रुपये अशा अवस्थेत ते सामाजिक कार्यकर्ते विनायक केसरकर यांना आढळून आले.
विनायक यांनी त्यांची विचारपूस करून सर्व घटना जाणून घेतली. तसेच त्या दोघांना काकती येथील एका हॉटेलात काम दिले. त्यांचा उदरनिर्वाह चांगला चालत होता. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यामुळे हॉटेल देखील झाले आणि त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न पडला. कालांतराने ते दोघेही आजारी पडले. त्यांना पुन्हा विनायक केसरकर यांच्या प्रयत्नातून उपचार मिळाले. त्यातील एक जण खूप आजारी होता. मात्र त्याला देखील बरे करण्यात आले.
दरम्यान हॉटेल मालकाने त्यांना त्यांचा पूर्ण पगार दिला. लाॅक डाऊनमुळे दिनेश सिंग आणि भाऊसाहेब घोदे यांच्या इच्छेनुसार त्यांना काल दि. 30 एप्रिल 2021 रोजी मुंबईच्या रेल्वेने पाठविण्यात आले. त्यातील भाऊसाहेब हा मुंबईतील आहे तो तिथे त्याच्या भावाकडे वास्तव्यास असणार आहे. उत्तराखंडातील दिनेशसिंग पुढे मुंबईतून उत्तराखंडला जाणार आहे.
सध्याच्या लॉकडाउनच्या बिकट परिस्थितीत अशा प्रकारे विनायक केसरकर यांनी आपल्याला सुखरूप घरी पोहोचवण्याची व्यवस्था केल्याबद्दल दिनेश सिंग आणि भाऊसाहेब घोदे यांनी केसरकर यांचे शतशः आभार मानले आहेत भाऊसाहेब घोदे याने तर विनायक केसरकर सरांच्या रूपात मला देवच भेटला असे सांगून केसरकर यांनी आपली कामे सोडून आम्हाला इतकी मदत केली की आम्हाला नोकरी नव्हती नोकरी लावली.
मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हॉटेल बंद पडले. मी आजारी पडलो. परंतु विनायक सरांनी सख्या भावाप्रमाणे माझी काळजी घेतली मी त्यांचा खूप खूप आभारी आहे, असे घोदे म्हणाला. यापूर्वी कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाउनच्या कालावधीत नेपाळच्या एका व्यक्तीसह अन्य कांही असहाय्य व्यक्तींना विनायक केसरकर यांनी त्यांच्या मूळ गावी जाण्यास मदत केली आहे.