अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा परिणाम काल रात्रीपासून बेळगाव शहर आणि तालुक्यात दिसून आला असून वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी हानी होण्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान येत्या काही तासात ‘तौक्ते’ वादळाची तीव्रता वाढून त्याचे महाचक्रीवादळात रुपांतर होणार आहे. याच्या प्रभावामुळे महाराष्ट्र व गोवा किनारपट्टी तसेच घाट क्षेत्रांमध्ये पुढील 24 तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
पूर्व अरबी समुद्राच्या मध्यभागात निर्माण झालेले ‘तौक्ते’ हे चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीला समांतर उत्तर -उत्तर पश्चिमेच्या दिशेने प्रवास करीत असून या वादळाचा आत्तापर्यंत केरळ व कर्नाटकला मोठा फटका बसला आहे. येत्या मंगळवारी दुपारी किंवा सायंकाळी हे वादळ गुजरात किनारपट्टीला पोरबंदर ते नलिया दरम्यान धडकेल असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानंतर या वादळाचा प्रभाव पुढील पाच दिवस राहणार आहे. या वादळामुळे कर्नाटकातील सर्व जिल्ह्यांमध्ये पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. कारवार जिल्ह्यात येत्या 19 मेपर्यंत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कारवार प्रमाणेच मंगळूर जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आले असून कांही ठिकाणी 20 सें.मी पेक्षा अधिक पाऊस पडू शकतो. वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन कालपासून राज्याच्या कांही भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे किनारपट्टी लगत असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट आणि उद्या -परवा एलो अलर्ट झाली करण्यात आला आहे.
तौक्ते चक्रीवादळामुळे राज्याच्या उत्तर आणि दक्षिण भागातील अंतर्गत जिल्ह्यांमध्ये व्यापक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बेळगावसह शिमोगा, हासन, कोडगु, म्हैसूर, चामराजनगर, मंड्या, धारवाड आणि हावेरी जिल्ह्यात कांही ठिकाणी मुसळधार अथवा अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या हवामान खात्याने मंगळूर, कारवार, उडपी, गदग, कलबुर्गी, रायचूर, चामराजनगर, चिक्कमंगळूर, चित्रदुर्ग, दावणगिरी, हासन, कोडगु, म्हैसूर, रामनगर आणि शिमोगा या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह विजेचा कडकडाटात ताशी 30 ते 40 कि. मी. वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. किनारपट्टीवरील मच्छिमारांना चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला असून मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असा आदेश देण्यात आला आहे.
दरम्यान, बेळगाव शहर आणि तालुक्यातला काल रात्रीपासुन वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असून स्मार्ट सिटीच्या अर्धवट राहिलेल्या कामाच्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येत आहे. कांही ठिकाणी छताचे पत्रे उडून जाण्याबरोबरच झाडाच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
लक्ष्मी गल्ली, खणगाव खुर्द येथे चक्रीवादळामुळे घरावरील पत्रे कोसळून नुकसान झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. खणगाव गावचे रहिवासी गणेश पाटील यांच्या घरावरील पत्रे वाऱ्याने उडून इलेक्ट्रिसिटी खांबावर कोसळल्यामुळे बरेच नुकसान होऊन वीजपुरवठा खंडित झाला. सदर घटना सकाळी 6 वाजता घडल्याने संबंधित भागामध्ये एकच गोंधळ उडाला.
चक्रीवादळामुळे काल सायंकाळपासूनच शहर परिसरात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या अचानक आगमनामुळे नागरिकांना आपले रेनकोट -छत्र्या आदी पावसाळी साहित्य पुन्हा बाहेर काढावे लागले आहे. त्याशिवाय सकाळी दहाच्या आतच खरेदी उरकून घेण्याचा नियम असल्याने भर पावसात नागरिक भाजी आणि अन्य साहित्याच्या खरेदीसाठी बाहेर पडले मात्र पोलिसांनी साडेनऊ पासूनच त्यांना हटकण्यास सुरुवात केलेली दिसून आली.