कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढत चालली असून ग्रामीण भागामध्ये मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. यासाठी ग्रामीण किंवा विभागीय स्तरावर किमान 30 बेड्सचे कोविंड केअर सेंटर (सीसीसी) स्थापन करावे, अशी सूचना सरकारकडून नव्याने जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचिद्वारे करण्यात आली आहे.
शहरी भागासह ग्रामीण भागातीलही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे ग्रामीण भागात कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या उद्देशाने सरकारच्यावतीने नवी मार्गदर्शक सूची जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागात कोवीड केअर सेंटर स्थापण्याची सूचना करण्यात आली आहे. कमी प्रमाणात लक्षणे असणाऱ्या आणि लक्षणे नसणाऱ्या रुग्णांवर याठिकाणी उपचार करण्यात यावेत. श्वसनाशी संबंधित समस्या आढळून आलेल्या रुग्णांना नजीकच्या इस्पितळात दाखल करण्याची व्यवस्था करावी. आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावे.
नागरिकांमध्ये कोरोना विषयी असणारी भीती, चुकीची माहिती आणि गैरसमज दूर करावेत. याबाबत त्यांना आवश्यक माहिती पुरवावी. ऑक्सीमीटर, थर्मामीटर यासह अन्य आवश्यक उपकरणांचा पुरवठा करावा. केंद्रात संसर्ग असलेल्या आणि कोरोनाची कमी प्रमाणात लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि समुदाय आरोग्य केंद्रांचा विलगीकरण केंद्रासाठी वापर करावा. या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या अन्य सुविधाही उपलब्ध कराव्यात अशी सूचना करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात वेगाने पसरत असणाऱ्या कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे मार्गदर्शक सूचीनुसार आरोग्य सुविधेचा मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत यासह झोपडपट्टी तसेच भटकी जमात असणाऱ्या भागातही कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील जनतेला आरोग्यसेवा पुरविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय सेवांना गती द्यावी या पद्धतीने एकंदरीत ग्रामीण भागातील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक उपाययोजना हाती घेण्याची सूचना नव्या मार्गदर्शक सूचीद्वारे राज्यातील जिल्हा प्रशासनांना करण्यात आली आहे.