सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या प्रतिकूल परिस्थितीत समाजसेवेत आघाडीवर असणाऱ्या श्रीराम सेना हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी कोरोनामुळे निधन पावलेल्या एका ख्रिश्चन महिलेवर अंत्यसंस्कार केले.
बेळगावात बेड्सची सोय न झाल्यामुळे कोप्पळ येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या नेहरूनगर येथील एका कोरोनाग्रस्त ख्रिश्चन महिलेचे उपचाराचा फायदा न होता निधन झाले.
कोरोना संसर्गाच्या धास्तीमुळे ख्रिश्चन समाजातील कोणीही या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास पुढे येण्यास तयार नव्हते. तेंव्हा संबंधित महिलेच्या नातलगांनी श्रीराम सेना हिंदुस्तानकडे मदत मागितली.
त्यावेळी श्रीराम सेनेचे कार्यकर्ते शंकर पाटील, सचिन पाटील, पप्पू शिंदे आणि सुदेश लाटे यांनी तात्काळ मदतीला धावून जाताना आज सकाळी संबंधित मृत महिलेवर रेसकोर्स नजीकच्या ख्रिश्चन स्मशान भूमीमध्ये दफनविधी पार पाडले.
कोरोना काळात बहुतेक सर्वच सामाजिक संघटना जाती धर्मा पलीकडे जाऊन माणुसकीचे कार्य करताना दिसत आहेत.