कोरोना प्रादुर्भावाच्या सध्याच्या दुसऱ्या विध्वंसक लाटेमध्ये बेळगाव शहरात असे कांही कोरोना योद्धे आहेत ज्यांनी अनेकांचे जीव वाचवले आहेत. अशा कोरोना योध्यांपैकी शंकर पाटील हे एक असून ते श्रीराम सेना हिंदुस्तानचे वरिष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांनी या लॉक डाउनच्या काळात प्रसंगावधान राखत स्वतः एक -दोन डॉक्टरांचे पथक घेऊन 19 रुग्णांचे विलगीकरण करण्याद्वारे प्राण वाचविले आहेत.
बेळगाव लाईव्हने सोमवारी शंकर पाटील यांचे कार्य आणि कार्यपद्धती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कोरोना प्रादुर्भाव काळातील आपल्या जनसेवेची माहिती देताना शंकर पाटील म्हणाले की, मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटे वेळी खाजगी ॲम्ब्युलन्स चालकांकडून गरीब गरजू लोकांची अक्षरशः लूट करण्यात येत होती. सिव्हिल हॉस्पिटल ते सदाशिवनगर स्मशानभुमीपर्यंत मृतदेह घेऊन जाण्यासाठी तब्बल 15 ते 20 हजार रुपयेची मागणी केली जात होती. तेव्हा दादांनी (रमाकांत कोंडुसकर) कसेही करून हा लुटालुटीचा प्रकार थांबविण्याचा निर्धार करुन आम्हाला तसा आदेश दिला.
त्यानुसार आम्ही स्वतःची एक रुग्णवाहिका तयार करून मागील वर्षापासून विनामूल्य रुग्णसेवा देत आहोत. कोरोनाच्या पहिल्या लाटे पेक्षा या दुसऱ्या लाटेत अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत यावर्षी आमचे कार्यकर्ते हिरीरीने मदत करण्यासाठी पुढे सरसावले होते, परंतु आमच्याकडे आवश्यक संसाधनांची कमतरता होती. त्यामुळे कुठेतरी आम्ही कमी पडत होतो. तेंव्हा दादांनी यावर्षी आणखी दोन ऍम्ब्युलन्स वाढवल्या आहेत. आता आम्हा कार्यकर्त्यांची तीन -चार पथकं मदत कार्यात सक्रिय असून आतापर्यंत आम्ही एकूण 138 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत अशी माहिती शंकर पाटील यांनी दिली.
आमचे स्वतःचे डॉक्टरांचे पथक आहे गणाचारी गल्ली येथे आमचा स्वतःचा दवाखाना देखील आहे. कोरोना प्रादुर्भावाचा परिस्थितीत ताप, सर्दी, खोकला यासारख्या किरकोळ आजारांवर इतर ठिकाणी उपचारास नकार दिला जात असल्यामुळे आम्ही गेल्या गणेशोत्सवामध्ये हा दवाखाना सुरू केला. ज्यामुळे नागरिकांच्या किरकोळ आजारांवर उपचाराची सोय झाली आहे, असे पाटील यांनी सांगितले.
शंकर पाटील पुढे म्हणाले की, कोरोनाग्रस्तावर अंत्यसंस्कार करण्यास पुढाकार घेताना मयत हा आमच्या कुटुंबातील आहे असे समजून आणि त्याच्या कुटुंबाला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्याचा उद्देश आमच्या समोर असतो. कुटुंबातील एक सदस्य अचानक आपल्यातून निघून गेल्यामुळे अन्य कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असतो. आम्ही मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन जातेवेळी त्यांचा दुखा:वेग -आक्रोश मन हेलावून सोडणारा असतो. मात्र आम्हाला भावनावश होऊन चालत नाही. कारण त्याचा परिणाम आम्ही घेतलेल्या अंत्यसंस्काराच्या कार्यावर होऊ शकतो. एकंदर अशावेळी सर्व भावनांना मुरड घालून आम्हाला अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडावे लागते.
आपल्या कार्यपद्धतीबद्दल बोलताना आम्हाला पहाटे 4 -5 वाजल्यापासून मृतांच्या नातेवाईकांचे फोन येण्यास सुरुवात होते. त्यानंतर सर्व माहिती घेऊन 6 वाजता आमचे पथक कार्यरत होते. एकदा का सकाळी नाश्ता करून घराबाहेर पडलो की रात्री उशिरापर्यंत घरी परतण्याची आमची वेळ निश्चित नसते अशी माहिती पाटील यांनी दिली.
ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा करण्यासाठी आमची वेगळी पथके आहेत मात्र सध्या प्रशासनाने बंदी घातल्यामुळे त्यांचे कार्य बंद आहे. त्याआधी फोन येताच आम्ही घरापर्यंत ऑक्सीजन सिलेंडर विनामूल्य पोहोचवत होतो, असे सांगून दुसऱ्या लाटेने बऱ्याच जणांना आमच्या पासुन दूर केले आहे, जे लोक आत्तापर्यंत वाचले आहेत ते खूप नशीबवान आहेत. कोरोना आता जाणार नाही, तेंव्हा सर्वांनी फेसमास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंगचा पालन आणि सॅनिटायझर्सचा वापर यासह कोरोना मार्गदर्शक सूचीचे पालन करून स्वतःला सुरक्षित ठेवावे. कोरोना योद्ध्यांनी देखील आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन शंकर पाटील यांनी शेवटी केले.