जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी शनिवार दि. 29 मे रोजी सकाळी 6 वाजल्यापासून सोमवार दि. 31 मे रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत शहरासह जिल्ह्यामध्ये संपूर्ण लॉक डाऊन लागू केला आहे.
सदर लाॅक डाऊन दरम्यान यावेळी बँका आणि एटीएम देखील बंद राहणार आहेत. विकेंड लॉक डाऊनच्या कालावधीत शनिवारी आणि रविवारी सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत भाजी वगैरे खरेदीस मुभा नसेल. फक्त दूध विक्रीला परवानगी असणार आहे.
या दोन दिवसाच्या संपूर्ण लाॅक डाऊन कालावधीत सर्व अनावश्यक व्यवहार अथवा उपक्रम संपूर्णतः बंद असतील. विकेंड लॉकडाउन कालावधीत दूध विक्री, औषध दुकाने, आपत्कालीन रुग्णसेवा, पूर्वनियोजित परवानगी असलेले लग्नसमारंभ, आंतर जिल्हा आणि आंतर राज्य वाहतूक तसेच रेशन दुकाने यांना परवानगी असणार आहे.
याखेरीज ग्रामपंचायत किंवा पीडीओ यांच्या परवानगीने प्रत्येक गावातील पाच जणांना सकाळी 6 ते दुपारी 12 या कालावधी मध्ये शहरात येऊन कृषी सेवा केंद्रातून शेतीसाठी आवश्यक बियाणं आणि इतर कृषी साहित्य खरेदी करता येईल.
ज्या नागरिकांना रेल्वे अथवा विमान प्रवासास जावयाचे आहे, ते प्रवासाचे तिकीट पास म्हणून दाखवू शकतात. मालवाहू वाहनांना वाहतुकीस परवानगी असेल तथापि आपत्कालीन वैद्यकीय सेवा वगळता अन्य वाहनांच्या वाहतुकीवर बंदी असणार असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी सांगितले आहे.