Friday, November 15, 2024

/

मराठी भाषिकांवरील अन्याया मुळेच भाजपचे मताधिक्य कमी

 belgaum

बेळगाव लोकसभा पोटनिवडणूकीत झालेला काँग्रेसचा पराभव हा अनपेक्षित असल्यामुळे निराशा झाली हे खरे आहे. मात्र लोकशाही व्यवस्थेत जनादेश शिरोधार्य मानला पाहिजे असे सांगून मराठी भाषिकांवर अन्याय भाजपचे मताधिक्य कमी होण्यास कारणीभूत ठरला, असे स्पष्ट मत काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.

बेळगाव लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार असलेल्या सतीश जारकीहोळी यांना अल्प मतांनी पराभव पत्करावा लागला. यासंदर्भात मंगळवारी पत्रकारांशी बोलताना जारकीहोळी म्हणाले, बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसला खूप अपेक्षा होत्या. कमी मताधिक्क्याने जिंकूनही भाजप नेत्यांनी हा आपला विजय नसल्याचे म्हंटले आहे. परंतु लोकशाहीत जनादेशाचा आदर केलाच पाहिजे. गोकाकमध्ये भाजपला अधिक मते मिळाल्याबद्दल बोलताना भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप जारकीहोळी यांनी केला. रमेश जारकीहोळी घराबाहेरच पडलेच नाहीत. निवडणूक काळात तर नाहीच नाही. हे सगळे कार्यकर्त्यांचे काम आहे. मतदारांना पैशाचे आमिष दाखविण्यात आले. कांही ठिकाणी तर एका मता मागे 200 रुपये वाटण्यात आले असल्याचा आरोप सतीश जारकीहोळी यांनी केला.

भाजपला विजयासाठी झगडावे लागले याचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे गेल्या दीड -दोन वर्षात पोलिसांकडून मराठी भाषिकांवर गुन्हे नोंदवून केला गेलेला अन्याय होय. मराठी भाषिकांनाही मत स्वातंत्र्य आहे. आम्ही त्यांच्यावर दबाव आणू शकत नाही. त्यांना भडकवणारे कोण? सत्ताधारी पक्षच. मराठी भाषिकांवर गुन्हे नोंदवायला कोण सांगितले तुम्ही का मी? त्यांनी गुन्हे नोंदविले आणि त्याचा परिणाम निवडणुकीत दिसून आला. गेल्या दीड -दोन वर्षात मराठी भाषिकांच्या बाबतीतील पोलिसांचे वर्तन भाजपला कमी मताधिक्य मिळण्याच्या प्रमुख कारणांपैकी एक असू शकते, असे सतीश जारकीहोळी म्हणाले.

चामराजनगर दुर्घटनेची जबाबदारी सरकारमधील कोणीही घेण्यास तयार नाही. एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. राज्य सरकारने या दुर्घटनेची जबाबदारी घ्यायला हवी. ऑक्सीजन टंचाईचा प्रश्न सरकार गांभीर्याने घेत नाही. ऑक्सिजन पुरवुन लोकांचे प्राण वाचवायचा प्रयत्न सरकार करत नाही, अशी टीका जारकीहोळी यांनी केली. एकंदरीत लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा पराभव अनपेक्षित होता. भाजपला अधिक मते मिळण्यास पैशाचे वाटप कारणीभूत असल्याचे सांगत चामराजनगर दुर्घटनेला सरकारच जबाबदार असल्याचा आरोपही सतीश जारकीहोळी यांनी यावेळी केला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.