बेळगावच्या श्री आनंद लाईफ सायन्सेस लिमिटेड या कंपनीला बायोटेक कंपनीच्या सहकार्याने रेमडेसिव्हिर इंजेक्शन बनविण्याचे कंत्राट मिळाले असून या इंजेक्शनचे उत्पादन आजपासून बेळगावात सुरू होणार आहे.
कोरोना बाधित रुग्णांना बरे करण्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शन महत्वाची भूमिका निभावते. रेमडेसिव्हिर इंजेक्शन बनविण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याचा पुरवठा बेळगावला झाला आहे. गेल्या कांही दिवसांपासून इंजेक्शन तयार करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तूंची जुळवाजुळव करण्याचे काम हाती घेण्यात आले होते.
शहरातील श्री आनंद लाईफ सायन्सेस लिमिटेड या कंपनीला बायोटेक कंपनीच्या सहकार्याने आजपासून रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे उत्पादन करत आहे. या कंपनीकडून 80 तासात रेमडेसिव्हिर औषधाच्या 8000 कुपींची निर्मिती केली जाणार आहे.
रेमडेसिव्हिर इंजेक्शन तयार झाल्यानंतर या इंजेक्शनवर पूर्णपणे केंद्र सरकारचा अधिकार असणार आहे. त्यामुळे बेळगाव शहरात या इंजेक्शनचे उत्पादन झाले तरी राज्याला हे इंजेक्शन केंद्र सरकारकडून मिळणार आहे.
श्री आनंद लाइफ सायन्स लिमिटेड ही कंपनी 1988 पासून औषधे तयार करत आहे. या कंपनीकडून 500 हून अधिक प्रकारची इंजेक्शने तयार केली जातात. होनगा औद्योगिक वसाहतीमध्ये श्री आनंद लाइफ सायन्सेस लिमिटेड या कंपनीचा कारखाना असून देशासह परदेशातही या कंपनीकडून इंजेक्शनचा पुरवठा केला जातो, अशी माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे.