मिरज -हुबळी रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणामुळे शहरातील या मार्गा शेजारील घरांना कोणताही धोका निर्माण होणार नाही, असा विश्वास आमदार ॲड. अनिल बेनके यांनी व्यक्त केला.
मिरज -हुबळी रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. बेळगाव शहरातून जाणाऱ्या या रेल्वेमार्गाच्या परिसराची आज आमदार बेनके यांनी महापालिका अधिकारी आणि रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली आणि नागरिकांच्या समस्या व तक्रारी जाणून घेतल्या. रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण झाल्यास मार्गाशेजारील घरांना धोका निर्माण होईल अशी भीती पाटील गल्ली, भांदुर गल्ली, तानाजी गल्ली, फुलबाग गल्ली आणि ताशिलदार गल्ली येथील नागरिकांनी व्यक्त करून दुपदरी करण्यास विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात आमदार ॲड. अनिल बेनके यांच्यासमवेत महापालिका अधिकारी व रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आज रेल्वेमार्गाच्या ठिकाणी भेट दिली.
यावेळी स्थानिक नागरिकांनी रेल्वे मार्गाच्या दुतर्फा घातलेल्या भिंतीमुळे रेल्वे मार्ग ओलांडता येत नसल्यामुळे निर्माण झालेली समस्या, रेल्वेच्या हादऱ्यामुळे घराच्या भिंतींना तडे जाण्याची शक्यता आदी तक्रारी मांडल्या. तसेच रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी लोकवस्तीच्या भागात किमान दोन माणसे पायी ये -जा करू शकतील इतकी वाट करून द्यावी, अशी मागणी केली.
नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन याप्रसंगी बोलताना आमदार ॲड. अनिल बेनके यांनी मिरज -हुबळी रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणामुळे शहरातील या मार्गा शेजारील घरांना कोणताही धोका निर्माण होणार नाही, असे सांगितले. त्याला उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला. याखेरीज रेल्वे मार्ग करण्यासाठी ठराविक अंतरावर किरकोळ वहिवाटीसाठी मार्ग खुला ठेवण्याची सूचना आपण देऊ, असे आश्वासन आमदारांनी दिले.
नागरिकांनी घाबरू जाऊ नये. कारण रेल्वे आणि महापालिकेचे अधिकारी रेल्वे मार्गामुळे जर कांही समस्या निर्माण होणार असेल तर त्या समस्येचे मूळ शोधून त्यांचे निवारण करतील असेही आमदार बेनके यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी रेल्वेचे संबंधित अधिकारी, रेल्वे मार्गाचे काम करणारे अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.