केंद्राच्या शेतकरीविरोधी कृषी कायद्यांच्या विरोधातील 6 महिने सुरू असलेल्या आंदोलनाकडे आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याबद्दल शेतकऱ्यांनी आज देशभर काळा दिन पाळला असून बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनांनी काळे झेंडे फडकावत ठिय्या आंदोलन केले.
केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या 26 नोव्हेंबर 2020 पासून नवी दिल्ली येथे शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी आज देशभर काळा दिन पाळला असून बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनांनी काळे झेंडे फडकावत ठिय्या आंदोलन केले.
केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा कायद्याच्या विरोधात विविध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला आज सहा महिने पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय संयुक्त किसान मोर्चाने आज 26 मे रोजी देशभरात काळा दिन पाळण्याचे आवाहन केले आहे.
राष्ट्रीय संयुक्त किसान मोर्चाने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत बेळगावातील शेतकरी संघटनांकडून नव्या कृषी कायद्या विरोधात काळा दिन पाळण्यात येत आहे. त्याचप्रमाणे रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडून काळे ध्वज फडकाविले.
कोरोना संकटकाळात संयुक्त किसान मोर्चाने देशभरात काळा दिन पाळण्याचे जे आवाहन केले आहे, त्याला अनेकांनी प्रतिसाद देऊन आपल्या घरांवर आणि वाहनांवर काळे ध्वज लावून पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, गाझियाबाद सीमेवरील शेतकऱ्यांनी नव्या कृषी कायद्यांच्या विरोधातील आपले आंदोलन सुरूच ठेवताना काळा दिन पाळला.