दंड आकारण्याची प्रक्रिया सुरू न करता मालमत्ता कर भरण्याची मुदत सध्याचा क्लोज डाऊनचा कालावधी समाप्त झाल्यानंतर एक महिन्याने वाढवून दिली जावी, अशी मागणी सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनच्या विविध सेवाभावी संघटनांतर्फे करण्यात आली होती. या मागणीची दखल घेऊन सरकारने मालमत्ता कर भरण्याची मुदत वाढवून देताना अंतिम तारीख 30 जून 2021 ही निश्चित केली आहे.
दंड आकारण्याची प्रक्रिया सुरू न करता मालमत्ता कर भरण्याची मुदत सध्याचा क्लोज डाऊनचा कालावधी समाप्त झाल्यानंतर एक महिन्याने वाढवून दिली जावी अशी मागणी सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांनी गेल्या 30 एप्रिल 2021 रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडे केली होती. बेळगाव शहरातील मालमत्ता कर भरण्याची आज 30 एप्रिल 2021 ही अंतिम तारीख आहे. त्यानंतर उद्यापासून 15 टक्के दंड आकारून मालमत्ता कर भरून घेतला जाणार आहे. गेल्या कांही दिवसांपासून कोरोनाचा कहर झाला आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेले नागरिक या दंड आकारणीमुळे आणखी अडचणीत येणार आहे. त्याचप्रमाणे कर भरण्यासाठी उपलब्ध असलेली ‘बेळगाव वन’ ही ऑनलाईन सुविधा देखील बंद आहे.
बँकांमध्ये मालमत्ता कर भरून घेण्यास नकार दिला जातो. या सर्व बाबी ध्यानात घेऊन मालमत्ता कर भरण्याचा कालावधी वाढवून दिला जावा सध्याचा क्लोज डाऊनचा कालावधी समाप्त झाल्यानंतर पुढील एक महिन्याचा कालावधी मालमत्ता कर भरण्यासाठी दिला जावा. तसेच तूर्तास दंड आकारणी केली जाऊ नये, अशा आशयाचा तपशील त्या निवेदनात नमूद होता.
सदर निवेदनाची दखल सरकारने घेतली असून विना दंड मालमत्ता कर भरण्याचा कालावधी येत्या 30 जून 2021 पर्यंत वाढवून देण्यात आला आहे. सरकारने तसा अध्यादेश जारी केला असल्याची माहिती देखील अनगोळकर यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर हे राज्यात एकमेव आहेत की ज्यांनी सध्याची प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन मालमत्ता करासंदर्भात या पद्धतीने आवाज उठविला.
त्याचप्रमाणे बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी मालमत्ता कर भरण्याचा कालावधी वाढवून देण्यात यावा यासाठी अनगोळकर यांनी केलेल्या मागणीचा पाठपुरावा करत सरकार दरबारी सदर मागणीला मंजुरी मिळवून दिली आहे. या पद्धतीने मालमत्ता कर विनादंड भरण्याची मुदत वाढवून देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल सुरेंद्र अनगोळकर आणि आमदार बेनके यांना सर्वसामान्य नागरिक दुवा देत आहेत.