एकीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आयसोलेशन सेंटरमधून अनेक कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होऊन घरी परतत असताना दुसरीकडे बीम्स हॉस्पिटलच्या गलथानपणामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत हे पाहून अतीव दुःख होते असे सांगून याबाबत विचारणा केल्यास बीम्सच्या अधिकाऱ्यांकडून बेजबाबदार उत्तर मिळत असल्याबद्दल महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते कोरोना योद्धा मदन बामणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व्यक्तीशः तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आयसोलेशन सेंटरच्या माध्यमातून गेले कित्तेक दिवस कोरोनाग्रस्तांचे जीव वाचविण्यासाठी मदन बामणे आपल्या सहकाऱ्यांसमवेत अहोरात्र झटत आहेत. यासंदर्भात बेळगाव लाईव्हने त्यांची भेट घेतली असता बामणे यांनी बीम्स हॉस्पिटलच्या कारभारावर जोरदार टीका केली. गेल्या मार्च 2020 पासून कोरोना प्रादुर्भावाला प्रारंभ झाला आहे. मात्र आता वर्ष उलटून गेले तरी बिम्स – सिव्हील हॉस्पिटल किंवा जिल्हा प्रशासनाने कोरोना बाधितांच्या हितासाठी काय केले पाहिजे याची कोणतीही पूर्वतयारी केलेली दिसत नाही. आज गेले महिनाभर बीम्स हॉस्पिटलमध्ये सावळागोंधळ सुरू असून त्याची किंमत रुग्णांना आपला जीव गमावून मोजावी लागत आहे.
या हॉस्पिटलमध्ये बेड्स रिकामी असून देखील ते फूल्ल असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत तक्रारी वाढल्याने गेल्या कांही दिवसापासून मी दररोज बीम्समधील प्रत्येक वार्डमध्ये फिरत आहे. सध्याच्या संसर्गजन्य परिस्थितीत असे करणे चुकीचे असले तरी मी धाडसाने हॉस्पिटल मधील वार्डमध्ये जाऊन तेथील ऑक्सीजन बेड तपासून रिक्त असलेल्या बेड्सबद्दल गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना माहिती देत आहे. या पद्धतीने गेल्या 15 दिवसात जवळपास किमान 25 रुग्णांना मी ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करून दिले आहेत आणि त्यापैकी बरेच जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती बामणे यांनी दिली.
तथापि गेल्या दोन-तीन दिवसातील परिस्थिती पाहता बीम्स हॉस्पिटलमध्ये कोणत्याही रुग्णाला प्रवेश दिला जात नाही आहे. यासंदर्भात मी हॉस्पिटलचे संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांच्यासह जिल्हाधिकारी आणि हॉस्पिटलचे सुपरिटेंडेंट दंडगीसाहेब यांच्याशी संपर्क साधला असता या सर्वांनी सहकार्याची भूमिका घेण्याऐवजी अत्यंत चुकीची उत्तरे मला दिली. त्याचप्रमाणे दोन दिवसापूर्वी दंडगी यांच्याशी संपर्क साधून बीम्समधील मृत्यूच्या चिंताजनक वाढीबाबत विचारणा केली असता, मी त्याला जबाबदार नाही. मी काही उत्तर देऊ शकत नाही, असे अत्यंत बेजबाबदार उत्तर यांच्याकडून मिळाल्याचे बामणे यांनी स्पष्ट केले.
मदन बामणे यांनी जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या माध्यमातून डायग्नोस्टिक सेंटर्समध्ये केल्या जाणाऱ्या पैशाचा लुबाडणूकचा भांडाफोड केला आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की छातीत म्हणजे फुफ्फुसामध्ये कोरोनाविषाणुचा किती संसर्ग झाला आहे हे तपासण्यासाठी प्रत्येक रुग्णाला एचआरसिटी स्कॅन गरजेचे असते. सरकारने यासाठी 2500 रुपये इतका दर निश्चित केला आहे मात्र सरकारचा नियम धाब्यावर बसवून कांही डायग्नोस्टिक सेंटरमध्ये एचआरसिटी स्कॅनसाठी अव्वाच्या सव्वा बिल आकारले जात होते. याबाबतची माहिती मिळताच जायंटस् मेनच्या माध्यमातून आम्ही जोरदार आवाज उठविला. परिणामी आता सर्व डायग्नोस्टिक सेंटरमधून सरकारी दराप्रमाणे 2500 रु. दर आकारला जात आहे ज्याचा हजारो लोकांना फायदा झाला असून त्यांचे पैसे वाचले आहेत.
महाराष्ट्र एकीकरण समिती आयसोलेशन सेंटर बाबत बोलताना बामणे म्हणाले की, हे आयसोलेशन सेंटर माझ्या एकट्याच्या योगदानामुळे नव्हे तर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि लोकवर्गणीतून कार्यरत आहे. या सेंटरमध्ये अनेक जणांना जीवदान देण्याचे काम आम्ही करत आहोत. काल सायंकाळपर्यंत येथून 65 रुग्ण कोरोना मुक्त बरे होऊन गेले आहेत असे सांगून याचा एकीकडे आनंद आहे आणि दुसरीकडे बीम्स प्रशासनाच्या गलथानपणामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत याचे अतीव दुःख ही आहे, असे बामणे यांनी सांगितले.
सध्याची कोरोनाची दुसरी लाट अत्यंत धोकादायक आहे. तेंव्हा नागरिकांनी गटागटाने फिरू नये. विनाकारण घराबाहेर पडू नये. कोरोनाची चेन तोडावयाची असल्यास प्रत्येकाने घरी राहिले पाहिजे. गेल्या कांही दिवसात शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असली तरी ग्रामीण भागातील रुग्ण वाढत आहेत. सरकारने ग्रामीण भागातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावागावात रॅपिड अँटीजन टेस्ट सुरू केली आहे. मात्र बेळगाव तालुक्यात या टेस्ट सुरू झालेल्या दिसत नाहीत. तेंव्हा ग्रामपंचायत अध्यक्ष आणि पीडीओंनी याकडे तात्काळ लक्ष देऊन रॅपिड अँटीजन टेस्टची मोहीम आपापल्या गावात सुरू करणे गरजेचे आहे, असे मत कोरोना योद्धा मदन बामणे यांनी शेवटी व्यक्त केले.