सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये बेळगाव येथील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अर्थात बीम्समध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या परिचारिका आपल्या मूळ वेतनाची मागणी करताना दिसत आहेत.
सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीमध्ये प्रत्येक हॉस्पिटलमधील रुग्णांची देखभाल करण्यात नर्सेस अर्थात परिचारिका महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार सरकारने आदेश काढून देखील बीम्सच्या सुमारे 35 परिचारिकांना मूळ पगार पूर्णपणे न देता, प्रत्येकी फक्त 10 हजार रुपये वेतन दिले जात आहे.
तसेच कोवीड -19 अलाऊन्स अर्थात कोरोना भत्ता देखील दिला जात नाही. सरकारने गेल्या 2019 मध्ये काढलेल्या आदेशानुसार परिचारिकांना मूळ वेतन हे दिले गेलेच पाहिजे. परंतु बीम्समधील सुमारे 35 जण यापासून अद्याप वंचित आहेत.
कोरोना काळात चोवीस तास काम करून 10 हजार रुपये इतके तुटपुंजे वेतन दिले तर आम्ही जगायचे कसे? असा संतप्त सवाल सदर परिचारिकांनी केला आहे.
दरम्यान, बीम्समध्ये नव्याने भरती करून घेण्यात आलेल्या परिचारिकांना 25 हजार रुपये वेतन दिले जात आहे. परंतु गेल्या 13 वर्षापासून काम करणाऱ्या संबंधित 35 जणांना मात्र सरकारकडून मंजूर झालेला मूळ पगार अद्याप मिळालेला नाही.
याउलट राज्यातील अन्य सरकारी वैद्यकीय महाविद्यालय यांच्या हॉस्पिटलमधील कंत्राटी परिचारिकांना मूळ पगार व्यवस्थित दिला जात आहे.