सध्याच्या कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाउनच्या काळात होणारी गैरसोय लक्षात घेऊन निर्मल फाउंडेशनतर्फे शहरातील गरीब असहाय्य लोकांसह कोरोनाग्रस्तांच्या सहाय्यकांना मोफत भोजन पुरविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती फाउंडेशनचे प्रमुख भास्कर पाटील यांनी दिली.
निर्मल फाउंडेशन या माझ्या आईच्या नांवाने सुरू केलेल्या संस्थेतर्फे गेल्या 13 तारखेपासून म्हणजे अक्षय तृतीयेपासून आम्ही मोफत भोजन वाटपाचा उपक्रम सुरू केला आहे, असे भास्कर पाटील यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले.
ते पुढे म्हणाले की, या उपक्रमांतर्गत होमगार्डस्, शहरातील गरीब असहाय्य लोक आणि सिव्हील हॉस्पिटल येथे असणारे कोरोना बाधित रुग्णांचे अटेंडर्स अर्थात सहाय्यक अशा लोकांना आम्ही जेवणाची पाकिटे मोफत वितरीत करत आहोत. प्रारंभी आम्ही भोजनाच्या 120 पाकिटांचे वितरण करत होतो. मात्र आता दररोज जवळपास 600 पाकिटांचे वाटप केले जात आहे. पुलाव, शिरा, पाण्याची बाटली आणि एक केळं असे आमच्या भोजनाचे स्वरूप आहे, असे पाटील यांनी सांगितले.
रवी कदम, विनायक चौगुले, रितेश जुवेकर आदींच्या सहकार्यामुळेच आपण हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवू शकत असल्याचे भास्कर पाटील यांनी सांगितले. मोफत भोजनाचा हा उपक्रम कार्यकर्त्यांच्या 6 टीमद्वारे राबविला जातो.
कार्यकर्त्यांच्या या टीम भोजनाची पाकिटे व पाण्याच्या बाटल्या घेऊन शहराच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या मार्गावर फिरून भोजन वाटप करतात अशी माहिती देऊन यापूर्वी मध्यंतरी निर्मल फाउंडेशनतर्फे आपण 14 पीपीई किट्सचे वाटप केले असल्याचे त्यांनी सांगितले. लॉक डाऊननंतर जनहितार्थ आणखीन एक उपक्रम राबविण्याचा आपला विचार असल्याचे सांगून गरीब गरजू लोकांसाठी अन्नछत्र चालविण्याचे आपले स्वप्न या उपक्रमाद्वारे प्रत्यक्षात उतरत असल्याचे देखील भास्कर पाटील यांनी सांगितले.