कोरोना प्रादुर्भावाची भीषणता दिवसेंदिवस तीव्र होत चालली असताना ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे टिळकवाडी येथील एका खाजगी हॉस्पिटलमधील जवळपास पाच रुग्णांना बीम्स सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये हलविण्याची वेळ आल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली.
कोरोनामुळे सध्या निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये काही खाजगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत असून बऱ्याच हॉस्पिटल्सकडून रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजनची व्यवस्था करण्यास सांगितले जात आहे. ऑक्सिजनच्या या तुटवड्याची माहिती सरकारी अधिकारी डॉक्टर्स आणि एनजीओ सदस्य यांचा समावेश असणाऱ्या डिस्ट्रिक्ट कोवीड रिस्पॉन्स टीमला देण्यात आली आहे. आज सकाळी टिळकवाडी येथील लोटस हॉस्पिटलमधून ऑक्सीजन सिलेंडर्सच्या कमतरते बाबतचा फोन येताच कोवीड सपोर्ट ग्रुपने संबंधित रुग्णांना बीम्स हॉस्पिटलमध्ये हलविण्यासाठी ‘लोटस’कडे धाव घेतली त्यावेळी डॉक्टरांनी ज्या रुग्णांना बीम्समध्ये हलवायचे आहे त्यांची यादी देताच सपोर्ट ग्रुपने रूग्णांच्या नातलगांना हॉस्पिटलचे बिल आधार करा म्हणजे रुग्णांना हलवता येईल असे सांगितले तेव्हा नातेवाईक आपल्या रुग्णाला भीम हॉस्पिटलमध्ये हलविण्यास तयार नसल्यामुळे सपोर्ट ग्रुपला तब्बल 4 तास वाट पाहून ऑक्सीजनसह सुसज्ज असलेल्या आपल्या 4 रुग्णवाहिका घेऊन पुन्हा माघारी परतावे लागले.
याच प्रकारची घटना मेटगुड हॉस्पिटल येथे आज सकाळी घडली. त्याठिकाणी देखिल ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यावेळी रात्री 10:30 च्या सुमारास एकाने याबाबतची माहिती हेल्प फॉर नीडीचे सुरेंद्र अनगोळकर यांना देताच त्यांनी तात्काळ हॉस्पिटलकडे धाव घेतली. डॉक्टरांकडे चौकशी केली असता हाॅस्पिटलकडे ऑक्सिजनचा मर्यादित साठा असल्याची माहिती देण्यात आली. तसेच तातडीने 15 ऑक्सीजन सिलेंडर्सची गरज असल्याचे सांगण्यात आले. तेंव्हा सुरेंद्र अनगोळकर यांनी याकामी पुढाकार घेत आपले मित्र सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांच्याशी संपर्क साधला.
तेंव्हा क्षणाचा विलंब न लावता तात्काळ मदतीला तयार होताना दरेकर यांनी आपल्याकडे 9 ऑक्सिजन सिलेंडर्स देऊ केले. त्यानंतर हेल्प फॉर नीडीच्या ॲम्बुलन्समधून 11:30 च्या सुमारास ते सिलेंडर्स मेटगुड हॉस्पिटल येथे आणताच रुग्णांच्या नातेवाइकांचे चेहरे आनंदाने उजळून आणि त्यांनी अनगोळकर व दरेकर यांना धन्यवाद दिले. त्याचप्रमाणे अवघ्या तासाभरात ऑक्सीजन उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉक्टर्सनी देखील सुरेंद्र अनगोळकर यांची प्रशंसा करून धन्यवाद दिले.
दरम्यान, हेल्प फॉर नीडीच्यावतीने सुरेंद्र होळकर यांनी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांचे आभार मानले आहेत. कारण दरेकर यांना आपल्या होम काॅरंटाईन रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडर द्यायचे होते. मात्र तरीही त्याने ते मेटगुड हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी देऊ केले. संतोष दरेकर यांच्या रूग्णांना उद्या सकाळी 8 वाजल्यानंतर ऑक्सिजनची गरज लागणार असल्यामुळे मेटगुड हॉस्पिटलच्या डॉक्टर्सनी त्यांचे सिलेंडर तत्पूर्वी रिफिल करून देण्याचे आश्वासन दिले आहे.