बेळगावातील कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रसंगी मुलाने घराबाहेर काढलेल्या एका 68 वर्षीय वृध्दाला आता कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये घराबाहेर विस्तारित कुटुंब, नवे ऋणानुबंध गवसले आहेत. जनार्दन पेडणेकर असे या वृद्धाचे नांव असून एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी त्यांची वास्तविक जीवन कथा आहे.
मुलाने घरातून हाकलून दिल्यानंतर रस्त्यावर आलेल्या जनार्दन पेडणेकर यांना कोणताही आसरा नव्हता. रक्ताच्या नात्यानेच घराबाहेर काढून दूर लोटल्यामुळे बेघर झालेल्या पेडणेकर याना मग उदार मनाच्या लोकांनी अन्नपाण्यासह आसरा मिळवून दिला.
पिरनवाडी येथील एका कॅंटीनमध्ये काम करणारे पेडणेकर एकेकाळी आपली पत्नी आणि दोन मुलांसमवेत सुखी जीवन व्यतीत करत होते. परंतु नियतीला हे पहावल नाही. एके दिवशी पेडणेकर यांचा रस्ते अपघात झाला आणि त्यांच्या पायाला व पोटाला गंभीर इजा झाली. सिव्हील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि पायाने अधू झालेल्या पेडणेकर यांना चालणे अवघड होऊन बसले.
दरम्यानच्या काळात त्यांना आपली नोकरीही गमवावी लागली आणि कमाई नसल्यामुळे घरातील आदर ही कमी झाला. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्यांची मुले त्यांना घालून पाडून बोलू लागली, शिवीगाळ करू लागली. परिणामी प्रचंड औदासिन्य आल्यामुळे त्यांच्या पत्नीचे त्यातच निधन झाले. आई निधन पावताच अपंग अवस्थेतील आपल्या वडीलाचे ओझे नको असल्यामुळे मुलांनी पेडणेकर यांना घर सोडून जाण्यास सांगितले. मुलांनी घराबाहेर काढल्यामुळे रस्त्यावर आलेल्या पेडणेकर यांच्यासमोर जगण्यासाठी पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. शहरातील कॅम्प परिसरात एका रस्त्याशेजारी पडून असलेल्या जनार्दन पेडणेकर यांना हळूहळू आसपासचे लोक ओळखू लागले. या काळात अन्न आणि निवाऱ्यासाठी त्यांनी कॅम्प परिसरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पायपीट करण्यास सुरुवात केली. याच वेळी त्यांची गाठ सामाजिक कार्यकर्ते अकिब बेपार यांच्याशी पडली.
बेपारी आणि त्या भागातील सर्व रहिवासी माझ्या बाबतीत सभ्य आणि उदार आहेत. ते मला कपडे आणि पोटासाठी जेवण वगैरे देतात. बेपारी यांनी मला राहण्यासाठी एक शेड देखील उपलब्ध करून दिले आहे असे जनार्दन पेडणेकर यांनी सांगितले. स्थानिक रहिवाशांपैकी लॉन्ड्री चालक असणारा एक जण त्यांचे कपडे मोफत धुऊन इस्त्री करून देतो. कांही जण आपल्याला अन्नपदार्थांत सोबत पैसेही देतात असे पेडणेकर यांनी सांगितले. कधी ना कधी आपली मुले आपल्याला पुन्हा घरी बोलवतील या अपेक्षेने लोकांनी दिलेल्या पैशातून बचत केलेल्या पैशात पेडणेकर आपला फोन रिचार्ज करत असतात.
जेंव्हा याबाबतची माहिती बेपारी आणि इतर स्थानिक रहिवाशांना समजताच त्यांनी पेडणेकर यांच्या मुलाशी संपर्क साधून बोलावून घेतले. तेंव्हा त्याने माझ्या वडिलांना मी परत घरी घेऊन जातो असे आश्वासन दिले असले तरी अद्यापही तो कॅम्पमध्ये फिरकलेला नाही. सध्या कोरोनाचा संसर्ग तीव्र असल्यामुळे पेडणेकर यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून आम्ही त्यांना रस्त्यावर फिरू देत नाही असे बेपारी यांनी सांगितले. माझ्या दुकानाच्या जागेतील शेडमध्ये मी त्यांची राहण्याची व्यवस्था केली आहे आणि आवश्यकता असेल तरच बाहेर जा असे त्यांना सांगितले आहे. आमच्या परिसरातील बरेचशे लोक वेळोवेळी जेवण किंवा खाद्य पदार्थ देऊन त्यांची काळजी घेत असतात असे सांगून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आम्ही त्यांची एखाद्या वृद्धाश्रमात सोय करणार आहोत. तोपर्यंत ते आमच्या बरोबरच राहतील, असे अकिब बेपारी यांनी सांगितले.
जनार्दन पेडणेकर म्हणतात की, मी एका कुटुंबाचा प्रमुख असलो तरी आज माझी परिस्थिती बेवारशाप्रमाणे झाली आहे. तथापि बेपारी यांच्यासह कॅम्पमधील इतर श्रीमंत मनाच्या लोकांशी माझा परिचय झाला हे माझे मोठे भाग्यच आहे. यासाठी मी देवाचा सदैव ऋणी राहीन.