सध्याचा कोरोना प्रादुर्भावाचा उद्रेक रोखण्यासाठी होम काॅरंटाईन ऐवजी इन्स्टिट्यूश्नल काॅरंटाईनवर अधिक भर दिला जावा. कोरोनाग्रस्तांना शहराबाहेर स्थानबद्धतेत ठेवले जावे, असे मागणी वजा स्पष्ट मत हेल्प फाॅर नीडी संघटनेचे प्रमुख कोरोना वॉरियर सुरेंद्र अनगोळकर यांनी व्यक्त केले आहे.
सध्याच्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात कोरोनाग्रस्त रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडर पोहोचवणे असो, भोजनाची पाकिटे वितरित करणे असो किंवा निधन पावलेल्या कोरोना बाधितांवर अंत्यसंस्कार करणे असो, बेळगाव शहरातील अनेक सेवाभावी संघ -संस्था आणि कोरोना वॉरियर्सनी याकामी पुढाकार घेऊन लोकांना मदत करण्याचे काम अविरत सुरू केले आहे. अशा कोरोना वाॅरियर्स पैकी सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर हे एक असून त्यांनी आत्तापर्यंत शहरातील कोरोनामुळे निधन पावलेल्या अनेक व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले आहेत.
बेळगाव लाईव्हने त्यांचे हे कार्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अनगोळकर यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. सुरेंद्र अनगोळकर म्हणाले की, मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रसंगी घरगुती ऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर अर्थात इन्स्टिट्यूश्नल काॅरंटाईनवर अधिक भर देण्यात आला होता. त्यामुळे कोरोनाला नियंत्रणाखाली आणता आले होते मात्र यावेळी कोरोनाच्या दुसर्या लाटेप्रसंगी इन्स्टिट्यूश्नल काॅरंटाईन ऐवजी होम काॅरंटाईन म्हणजे घरगुती विलगीकरणावर अधिक भर देण्यात आल्याचे दिसून येत आहे. माझ्यामते त्यामुळेच कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. तेंव्हा सरकारने इन्स्टिट्यूशनल काॅरंटाईनचा गांभीर्याने विचारण्याची मागणी करून कोरोनाग्रस्तांना शहराबाहेर स्थानबद्धतेत ठेवण्याची जी पद्धत होती ती पुन्हा सुरू करावी, जेणेकरून वाढत्या संक्रमणाला आळा बसू शकेल, असे अनगोळकर यांनी सांगितले.
आता हजारोंच्या संख्येने आढळून येणारे कोरोनाग्रस्त रुग्ण आणि मोठ्या संख्येने कोरोनामुळे मृत्यू पाहणारे लोक पाहता आत्ताच्या मानाने पूर्वीचा पहिल्या लाटेचा अनुभव बरा होता. माझ्या दोन ॲम्ब्युलन्स असून यापैकी एक खानापुरात तर दुसरी बेळगावात कार्यरत आहे.
सध्या खानापुरामध्ये आम्ही दिवसाकाठी कोरोनामुळे निधन पावलेल्या 7 ते 8 लोकांवर, त्याचप्रमाणे बेळगाव शहरात दररोज 15 ते 16 व्यक्तींवर अंत्यसंस्कार करत आहोत. परवा दिवशी तर तब्बल 25 जणांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आमच्यावर आली. वाईट एकाच गोष्टीचे वाटते की मृतदेहांना कोणीही हात लावण्यासाठी पुढे येत नाही. त्यासाठी आम्हालाच पुढाकार घ्यावा लागतो, अशी माहिती सुरेंद्र अनगोळकर यांनी दिली. तसेच दुःखाच्या वेळेत केलेल्या अशा मदतीचा वापर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केला जाऊ नये असे मतही त्यांनी व्यक्त केले.
रुग्णसेवा आणि मृतदेहांवरील अंत्यसंस्कारासाठी दररोज सकाळी 7 वाजता घराबाहेर पडून रात्री दोन-अडीचला पुन्हा घरी परतत असल्यामुळे गेल्या महिन्याभरात आपण आपल्या मुलांना दिवसा कधी भेटलोच नाही असे अनगोळकर यांनी सांगितले. नैसर्गिक मृत्युचे फोन आम्हाला रात्री आलेले असतात. अशा मृतदेहांवरील अंत्यसंस्कार आम्ही सकाळी 10 वाजेपर्यंत आटोपतो आणि त्यानंतर कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याचे कार्य सुरू होते, जे रात्री 12 -12:30 वाजेपर्यंत सुरू राहते, असेही त्यांनी सांगितले. या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक संघ -संस्था आणि कार्यकर्ते मदतीसाठी पुढे सरसावल्यामुळे आपल्यावरील रुग्णसेवेचा ताण बऱ्यापैकी हलका झाल्याचे त्यांनी मान्य केले.
तसेच सध्या लोकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये. पाच -दहा रुपयांच्या भाजीसाठी लोकांनी बाजारात गर्दी करू नये. कारण भाजीच्या निमित्ताने तुम्ही कोरोना घरी घेऊन जात आहात, जो घरातील वडीलधाऱ्यांसाठी जीवघेणा ठरू शकतो. तेंव्हा नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, असे कळकळीचे आवाहन शेवटी सुरेंद्र अनगोळकर यांनी केले.