कोरोना काळात अतुलनीय कार्य करत असलेल्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील आमदार निलेश लंके यांच्या भाळवणी येथील कोरोना केअर सेंटरला बेळगावच्या श्रीकांत नाईक यांनी 11,111 रुपयांची ऑनलाइन देणगी दिली आहे.
वडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणप्रेमी उद्योजक श्रीकांत नाईक यांनी दिलेल्या देणगी बद्दल मा. शरदचंद्रजी पवारसाहेब आरोग्य मंदिर भाळवणी यांनी नाईक यांना मनःपूर्वक धन्यवाद दिले आहेत.
कोरोना महामारीने संपूर्ण देशालाच नव्हे तर जगाला भयभीत केले आहे. अशा प्रतिकूल काळात माणुसकी दुरावण्याचे चित्रही पहावयास मिळत आहे. नातीगोती विसरली जात असून प्रत्येक जण स्वतःच्या स्वार्थासाठी आपण कसे सुरक्षित राहू याचाच विचार करू लागला आहे. मात्र मतदारांच्या आर्थिक मदतीतून आमदारपदाला गवसणी घालणाऱ्या निलेश लंके हे कोरोना संसर्ग काळात करत असलेले कार्य संपूर्ण देशातील लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरत आहे.
कोरोना काळात माणूस दुरावत चालला असताना आमदार लंके यांनी मोठ्या हिकमतीने कोरोना रुग्णाना वाचविण्यासाठी कोवीड केअर सेंटरची निर्मिती केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भाळवणी येथे एकाच वेळी तब्बल 1100 रूग्णांवर उपचार करता येऊ शकेल इतके प्रशस्त असे हे सेंटर आहे. सध्याच्या संसर्गजन्य परिस्थितीत फक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा कोरोना रुग्णांसाठी पुरेशी नाही तर त्याला आपला विश्वास मिळणे महत्त्वाचे आहे. कारण विश्वासावरच माणूस जगण्याची उमेद राखू शकतो, हे दाखवून देण्यासाठी आणि समाजाला सुरक्षित करण्यासाठी आमदार लंके यांनी अविरत सेवाकार्य चालविले आहे.
या कार्याने प्रभावित होऊन वडगावच्या श्रीकांत नाईक यांनी आमदार लंके यांच्या कोवीड केअर सेंटरला देणगी देऊ केली आहे. त्याचप्रमाणे लंके यांचा आदर्श घेऊन नाईक यांनी गरजूंना जीवनावश्यक साहित्य पुरवण्यासारखी जनसेवा देखील सुरू केली आहे.