कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तीव्रतेमुळे वाढत चाललेली मृतांची संख्या लक्षात घेऊन शहरातील स्मशानभूमीमध्ये सामूहिक अंत्यसंस्काराची तयारी केली जात आहे. अंजुमन इस्लाम कबरस्थान यामध्ये तर सुमारे 20 कबरी खोदून तयार ठेवण्यात आल्या आहेत.
कोरोनामुळे मृत पावणार्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अंत्यसंस्काराच्या प्रक्रियेवरील ताण वाढला आहे.
पूर्वतयारी नसल्यामुळे नातेवाईकांना मृतदेहांसह ताटकळत थांबावे लागत आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन शहरातील स्मशानभूमी आणि कबरस्तानांमध्ये सामूहिक अंत्यसंस्काराची तयारी केली जात आहे.
सदाशिवनगर येथील स्मशानभूमी आणि अंजुमन इस्लाम कब्रस्तान या ठिकाणी कोरोनामुळे मृत पावलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्याची सोय आहे. मृतांची वाढती संख्या लक्षात घेऊन अंजुमन कबरस्तानामध्ये तब्बल 20 कबरी खोदून तयार ठेवण्यात आल्या आहेत.
या ठिकाणी सध्या कोरोनामुळे मृत पावलेल्या 4 आणि अन्य कारणाने मृत पावलेल्या 4 मृतदेहांवर दफनविधी केला जाणार आहे. तसेच आणखी 8 मृतदेह याठिकाणी दफनविधीसाठी आणले जाणार असल्याचे सांगण्यात आले.